। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील मोहो येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 18 वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. त्यावेळचेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमुळे जणू काही शाळेचा वर्गच पुन्हा भरल्याचा भास सर्वांना झाला. यावेळी शिक्षकांसोबतचे प्रसंग, बाकांवरच्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
मोहो येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 2001 ते 2006 पर्यंत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन बुधवारी (दि.8) पार पडले. या स्नेहसंमेलनासाठी त्यावेळच्या मुख्याध्यापिका रसाळ, शिक्षक चिलवंत, ठाकरे, शिक्षिका भगत, म्हात्रे, बावा, सावंत आवर्जून उपस्थित होत्या. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गंमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधत मोहो शाळेतील त्यांच्या आठवणी पुन्हा जागवल्या.