कुंचल्यातून अद्भुत रंगछटा

पराग बोरसे यांचे जहांगीर कलादालनात चौथे चित्र प्रदर्शन
| माथेरान | वार्ताहर |
‘कला आणि मानवी चेतना’ या विषयाची महती आपल्या कुंचल्यातून जगभर पोहोचवणारे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे आणि अनेक अमेरिकन पुरस्कारांनी सन्मानित झालेले कर्जतचे सुपुत्र चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत मंगळवार (दि. 14) सुरू होत आहे. ‘तादात्म्य’ असे शीर्षक असलेल्या या प्रदर्शनात एकूण 22 चित्रे मांडण्यात येणार आहेत. ऑईल सॉफ्ट-पेस्टल्स आणि चारकोल या माध्यमातून कॅनव्हास आणि कागदावर ती साकारली आहेत. 20 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 अशा वेळेत प्रदर्शन विनामूल्य सुरू राहणार आहे.

‘तादात्म्य’ म्हणजे एकता. भगवान बुद्धांना जे विपश्यनेतून सापडले, कबीर, ज्ञानेश्‍वर, तुकाराम यांना जे समर्पणातून उमजले त्याचीच प्रचीती हे चित्र प्रदर्शन पाहताना कलारसिकांना काही क्षणांसाठी येईल, अशा प्रकारे बोरसे यांनी चित्रे साकारली आहेत. कर्जतसारख्या निसर्गरम्य परिसरात वास्तव्यास असणार्‍या पराग बोरसे यांना निसर्गात फिरताना आणि तो कागदावर उतरवताना अनुभवास आलेला तादात्म्य भाव त्यांनी आपल्या चित्रांतून मांडला आहे.

पाण्यामध्ये यथेच्छ म्हशींच्या पाठीवर बसून सफर करणारा एक लहान मुलगा, असे ’ईडन्स ट्रेल’ म्हणजे ’स्वर्गीय सफर’ नावाचे चित्र असेच रसिकांचे लक्ष वेधून घेते. या चित्रामध्ये म्हशींच्या गडद छटा, त्यांचे आकार चितारताना कुंचल्याच्या साहाय्याने मारलेले सहज फटकारे, त्याचबरोबर दुसर्‍या बाजूला पाण्यामध्ये पडलेले प्रतिबिंब, मुलाच्या उघड्या पाठीवर, पावलावर पडलेला प्रकाश आणि दुसरा पाय पाण्यात, अर्धा बाहेर दाखवताना केलेला रंगाचा फरक हे सगळंच अवर्णनीय आहे. पाणी, म्हशी यांच्यासाठी वापरलेल्या शीत रंगात लहान मुलाची अल्लड वृत्ती दाखावण्यासाठी वापरलेला उष्ण रंग चित्रकाराची कलात्मकता दाखवून देतो. पॅलेट नाईफचा वापर करून केलेले गडद रंगलेपनाचे हे सहा फुटी चित्र जाणत्या रसिकांना फ्रेंच चित्रकार क्लाऊड मोने आणि स्पॅनिश चित्रकार सरोला यांची आठवण करून देते.

Exit mobile version