तुटलेल्या संरक्षक कठड्याला प्लास्टिकचा आधार; अपघाती परिस्थितीकडे एमएसआरडीसीसीचे दुर्लक्ष
| सुधागड-पाली | वार्ताहर |
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली गावालगत असणार्या अंबा नदी पुलाचे संरक्षण कठडे तुटून नदीत पडल्याने मृत्यूमुख उघडे पडले आहे. या पुलाचे कठडे म्हणून प्लास्टिक पट्टी काम करीत आहे. परिणामी, जिवघेण्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अशातच महामार्गाच्या धोकादायक व जिवघेण्या परिस्थितीकडे एमएसआरडीसीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
वाकण-पाली-खोपोली महामार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, सद्यःस्थितीत या मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या वाढली असून, अनेक निष्पाप जिवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेकांना विकलांग होण्याची वेळ आली आहे.
पाली आंबा नदी पुलाचे संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान-मोठी वाहने खोल नदीपात्रात कोसळून अपघाताचा मोठा धोका जाणवत आहे. यापूर्वी आंबा नदीपुलावरुन झायलो नदीपात्रात कोसळून वृद्ध महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. हा पूल जुना व जर्जर झाला असून, चहूबाजूंनी मोडकळीस आलेला आहे. त्यामुळे तो केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती जनमानसातून वर्तवली जात आहे. परंतु, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मात्र जिवघेणे अपघात घडून निष्पाप जिवांचा बळी जाण्याच्या प्रतीक्षेत आहे का, असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.