मार्गावरुन प्रवास करणे धोकादायक; अवजड वाहतुकीकडे आरटीओचे दुर्लक्ष
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी-म्हसळा मार्गावर दिघी पोर्टच्या वाहनांची ओव्हरलोड वाहतूक गंभीर समस्या बनली आहे. हे सारे नेहमीचेच असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मात्र, बिनदिक्कत चालणार्या दिघी पोर्टच्या आडमुठ्या कारभारामुळे स्थानिक प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा रोष वाढत आहे.
दिघी ते माणगाव या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. मात्र, हे 60 किलोमीटर अंतर कापण्यासाठी अवजड वाहनांचा प्रवास इतर प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. दहा किंवा बाराचाकी तसेच याशिवाय मोठ्या वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक माल भरून कोळशाचा डोंगर रचला जात आहे. यामुळे रस्त्यावरती कोळशाची गळती तसेच वेगाची मर्यादा ओलांडल्याने छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना सुरूच आहेत. दिघी, वेळास तसेच गोंडघर फाटा येथून प्रवास करणे जिकिरीचे ठरले असून, अवजड वाहनांचा सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
दररोज मोठमोठी अवजड वाहने बिघाड होऊन रस्त्यावर दिवसभर उभी असतात. तर कोळसा घेऊन जाताना वाहनांच्या जवळ चालत जायलादेखील भीती वाटते. गावागावातून रस्त्यालगत लहान मुलांची शाळा आहे, दिवसा-रात्री अवजड वाहतूक होताना कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती नेहमी सतावत असते, असे ग्रामस्थ सांगतात. डंपर आणि ट्रेलरमधील ओव्हरलोड वाहतूक ही एक विकृतीच असून, त्यांच्यापुढे कारवाई करणार्या यंत्रणाही बधीर झाल्या आहेत.
वाहनावर कारवाईचा अधिकार आरटीओ तसेच संबंधित विभागाला असतो. मात्र, प्रादेशिक वाहतूक परिवहन विभागाच्या अधिकार्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, अवजड वाहतूक ही होतच आहे.