अंबा नदी प्रदूषणाच्या विळख्यात

नागरिक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीला प्रदूषण आणि घाणीने वेढले आहे. नदीच्या पाण्यावर तवंग व शेवाळ आले आहे. सांडपाणी, प्रदूषित पाणी, घाण व कचरा, वाळू उपसा यामुळे नदीचे नागरिक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबरोबर नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पाली शहराला येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा होतो. तसेच सुधागड तालुक्यातील अंबा नदी शेजारील गावांतील लोक व प्राणी देखील याच पाण्याचा पिण्यासाठी व वापरासाठी वापर करतात. पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी बंधारे कार्यान्वीत करुन अंबा नदिचे पाणी अडविले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. तसेच नदितून वाहून आलेले प्रदुषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. रासायनिक कपंनीमधून टाकऊ रसायन हे थेट आंबा नदीत सोडले जाते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदिवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदित टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखिल पाणी खराब होते. किनार्‍यावर टाकलेली घाण व कचरा पाण्यात जातो. परिणामी ते अधिक दुषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

अंबा नदीचे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हे प्रदूषण थांबवून अंबा नदी संवर्धनाची व योग्य नियोजनाची गरज आहे. फिल्टरपणी योजना कार्यान्वित झाली पाहिजे
सामाजिक कार्यकर्ते, पाली

अंबा नदीचे पाणी दूषित झाले आहे. नदी किनारी असलेल्या सर्व कंपन्यांना नोटीस पाठवलेली आहे. तसेच गटविकास अधिकार्‍यांसोबत या संदर्भात बैठक आयोजित केली आहे. नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे.
दिलीप रायण्णावार, तहसिलदार, पाली-सुधागड

Exit mobile version