पालीच्या शुद्ध पाणी योजनेचा राजकारण्यांना विसर
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
पालीच्या शुद्ध पाणी योजनेचा राजकारण्यांना नेहमीच विसर पडत आला आहे. शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्षे लालफितीत अडकून पडली आहे. त्यामुळे विकत घेतलेल्या पाण्यावर महिलांची काटकसर सुरू आहे. आरोग्याच्या दृष्टीने फिल्टर पाणी आवश्यक आहे. त्यामुळे पाणी विकत घ्यावे लागत आहे. सुधागड तालुक्यासह खालापूर, रोहा व पेण आदी तालुक्यातून वाहणारी व अनेकांची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीतून पाली शहराला पाणीपुरवठा होतो. तसेच सुधागड तालुक्यातील अंबा नदी शेजारील गावांतील लोक व प्राणीदेखील याच पाण्याचा पिण्यासाठी व वापरासाठी वापर करतात. मात्र, सध्या अंबा नदीचे पाणी निर्माल्य पिशव्या, कचरा, शेवाळ व केमिकलचा तवंग यामुळे प्रदूषित झाले आहे. पाण्यावर शेवाळ व रसायनामुळे हिरवट व लालसर तवंग आला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक, भाविक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी बंधारे कार्यान्वीत करुन अंबा नदिचे पाणी अडविले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदूषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. रासायनिक कंपनीमधून टाकऊ रसायन हे थेट अंबा नदीत सोडले जाते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाणदेखील साठते. नदीवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्यानेदेखील पाणी खराब होते. परिणामी, ते अधिक दूषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरूपाची दुर्गंधी येते, चवही खराब लागते. पाणी प्रदूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी, बहुसंख्य नागरिक अधिकचे पैसे खर्च करुन पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा आधार घेतात.
सुधागड तालुक्यातील पाली, राबगाव, आंबोले, रासळ, कानसळ, हेदवली, जांभूळपाडा आदी गावाजवळच अंबा नदीच्या काठावर अनेक रासायनिक व इतर कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. यातील काही कंपन्यांतील दूषित रसायनयुक्त पाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. यामुळे तालुक्यातील अंबा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे जनजीवन धोक्यात आले आहे. अशा काही कंपन्यांवर प्रदूषण नियामक मंडळाने याबाबत योग्य कारवाई करावी.
केतन म्हसके, उपाध्यक्ष,
शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्र, वावे-सुधागड
अंबा नदी जॅकवेलजवळ असलेला कचरा ताबडतोब काढून घेण्यात येईल. शुद्ध पाणी योजना लवकरात लवकर यावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे. नागरिकांनीही नदीचे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. पाणी उकळून व गाळून प्यावे. कंपन्यांनी आपले रसायन मिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडू नये.
प्रणाली सूरज शेळके,
नगराध्यक्षा, पाली
शुद्ध पाणी योजना कार्यान्वित व्हावी यासाठी ताबडतोब संबंधित विभागाची मीटिंग घेणार आहे. तसेच ज्या कंपन्या रसायनमिश्रित पाणी नदीमध्ये सोडून प्रदूषण करत आहेत त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे नोटीस पाठवण्यास सांगितले जाईल. अंबा नदीचे पाणी स्वच्छ सुंदर राहील यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
रविंद्र पाटील,
आमदार
पालीकर व भाविकांना दूषित पाणीपुरवठा
अंबा नदीच्या पाण्यावर कोणतीही शुद्धीकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालिकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात. पालीची स्थायी लोकसंख्या देखील पंधरा हजारहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे. शिवाय पाणीपुरवठा देखील अनियमित होतो.
शुद्ध पाणी योजनेचा विसर
पाली शुद्ध पाणी योजना ही 1974 साली मंजूर झाली आहे. सद्यःस्थितीत तिचा एकूण खर्च आता 27 कोटींवर गेला आहे. मात्र, ही 27 कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना लालफितीत अडकली आहे. राजकीय हेवेदावे आणि प्रशासकीय बाबी यामध्ये ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सर्व निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तत्कालीन मंत्री यांनी शुद्ध पाणी योजना कार्यान्वित करू असे आश्वासन देतात. मात्र, अजून काहीच झालेले नाही. प्रशासन व राजकारण्यांना पालीकरांचे हाल दिसत नाहीत. केवळ निवडणुकीपुरते आश्वासन दिले जाते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.