हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची मागणी
| उरण | वार्ताहर |
हनुमान कोळीवाडा गावाची अधिसूचना रद्द न करता पुनर्वसनाची 15 हेक्टर शेतजमीन वन विभागाला देणाऱ्या सर्व जिल्हा प्रशासनाच्या लोकसेवकांवर फौजदारी कारवाई करा, अशी मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रालय सचिव, जिल्हाधिकारी, कोकण भवन, कोकण आयुक्त, पोलीस आयुक्त नवी मुंबई, प्रांत कार्यालय, तहसीलदार, न्हावा शेवा पोलीस स्टेशन, उरण पोलीस ठाणे, मोरा पोलीस ठाणे आदी ठिकाणी पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आला आहे.
हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची फसवणूक करणाऱ्या सर्व जिल्हा प्रशासनाच्या लोकसेवकावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी केली आहे. शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेच्या माध्यमातून सदर समस्या मार्गी लागावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हनुमान कोळीवाडा गावाची दि.12/03/1987 ची अधिसूचना रद्द न करता पुनर्वसनाची 15 हेक्टर शेतजमीन दि.28/09/2022 रोजीचे अधिसूचनेने वन विभागाला देणाऱ्या सर्व जिल्हा प्रशासनाच्या लोकसेवकावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या वतीने शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहारद्वारे केली आहे.
जी काही कारवाई केली आहे, ती शासन नियमानुसार झाली आहे. शासनाच्या नियमांचे पालन करूनच सर्व प्रक्रिया पार पडली आहे. आम्ही कोणाचीही फसवणूक केली नाही. कोणावरही अत्याचार केला नाही.
उद्धव कदम,
तहसीलदार, उरण
हनुमान कोळीवाडा गावाची अधिसूचना रद्द न करता पुनर्वसनची 15 हेक्टर शेत जमीन वन विभागाला देण्यात आली. यात उरणचे तहसीलदार उद्धव कदम हे पूर्णपणे दोषी आहेत. त्यांनी हे चुकीचे काम केले आहे. तहसीलदार यांनी ग्रामस्थांची फसवणूक केली आहे.तहसीलदार उद्धव कदम यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी.
रमेश कोळी,
ग्रामस्थ हनुमान कोळीवाडा