नागरिकांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. सध्या अंबा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ व दूषित झाले आहे. त्याबरोबरच येथील अनेक वाहिन्या आतून गंजल्या आहेत, त्यामुळे काही दिवसांपासून पालीकरांना गढूळ व काळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे भाविक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खडकआळी येथील नळांना मागील महिनाभरापासून काळेकुट्ट पाणी येत आहे. नळाला पाणी आल्यावर सुरुवातीच्या काही काळ काळे पाणी येते आणि त्यानंतर मग थोडे स्वच्छ पाणी येते. याचबरोबर काही दिवसांपूर्वी बल्लाळेश्वर नगर, प्रबुद्ध नगर आदी ठिकाणीदेखील गढूळ, काळे व हिरवे पाणी येत होते. अशुद्ध व काळ्या पाण्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत.
यावर उपाययोजना म्हणून नगरपंचायतीतर्फे उन्हेरे धरणातील पाणी अंबा नदीमध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे अंबा नदीचे पाणी काही प्रमाणात शुद्ध झाले आहे. शेवाळ व घाण कमी झाली आहे. मात्र, तरीही सुरुवातीला नळांना होणारा पाणीपुरवठा हा गढूळ पाण्याचा होतो. कारण नळ्यांमध्ये पाणी घाण, शेवाळ जाऊन साठते आणि ती नळाद्वारे बाहेर येते.
अंबा नदीला प्रदूषणाचा विळखा
अंबा नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी, घाण व कचरा, वाळूउपसा यामुळे येथील नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आली आहे. कंपन्यातील दूषित रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदूषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाणदेखील साठते. नदीवर महिला धुणीभांडी करतात. याबरोबरच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्यानेदेखील पाणी खराब होते. परिणामी, ते अधिक दूषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
कोणतेही शुद्धीकरण न करता पाणीपुरवठा
पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणार्या या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात. पालीची स्थायी लोकसंख्यादेखील पंधरा हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे. शिवाय, 27 कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना लालफितीती अडकली आहे.
अनेक नळ पाईप हे फार जुने असल्यामुळे ते आतून गंजून खराब झाले आहेत. त्यांची दुरुस्ती करणे अवघड जाते. शिवाय, अनेक जलवाहिन्यांमध्ये कचरा, शेवाळ व घाण जाऊन साठून राहते आणि पाणीपुरवठा सुरू केल्यावर ती घाण व खराब पाणी सुरुवातीला नळाद्वारे बाहेर येते. शुद्ध पाणी योजना लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आवश्यक पाठपुरावादेखील करत आहोत. मात्र, यासाठी सर्वांचे सहकार्य व सोबत अपेक्षित आहे.
– प्रणाली शेळके, नगराध्यक्षा, पाली
खडकाळी येथे नळाला येणारे काळे पाणी हे तेथील गटाराचे काम सुरू असल्यामुळे येत होते. मात्र, आता तेथील दुरुस्ती केली आहे. शिवाय, उन्हेरे धरणाचे पाणी अंबा नदीला सोडल्यामुळे शहरात इतर ठिकाणीदेखील पाणी स्वच्छ येत आहे. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे.
– प्रतीक्षा पालांडे, पाणीपुरवठा व आरोग्य सभापती, पाली नगरपंचायत
नळाला अतिशय दूषित, दुर्गंधीयुक्त व काळेकुट्ट पाणी येत आहे. पूर्ण शहरातच दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे, अशी अनेक नागरिकांची तक्रार आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.
– महेश बारमुख, शिक्षक नागरिक, पाली