नागोठण्यात अंबेच्या पुराचे पाणी

एस.टी.स्थानकात, बाजार पेठ, कोळीवाडा व मोहल्ला जलमय
वाकण | वार्ताहर |
गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यासह नागोठणे विभागालाही झोडपून काढले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस दुथडी भरून वाहणार्‍याअंबा नदीने रविवारी (दि.18) सायंकाळी धोक्याची पातळी ओलांडली. त्यानंतर सोमवारी (दि.19) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास नागोठणे एस.टी.स्थानक, रिक्षा स्थानक, आठवडा बाजार, छ. शिवाजी महाराज चौक, मिनिडोर स्टँड, रिक्षा स्टँडच्या समोरील श्री. मरिआई मंदिर परिसर, नागोठणे कोळीवाडा, नागोठणे मोहल्ला तसेच इतर काही परिसरात पूराचे पाणी शिरले व नागोठणेकरांना यावर्षीच्या या पहिल्यावहिल्या पुराला सामोरे जावे लागले.

गेल्या सात आठ दिवसांपासून संपूर्ण रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच नागोठणे विभागासह पाली, खोपोली या ठिकाणी पडणा-या मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी गेले दोन दिवस दुथडी भरून वाहत होती. पावसाचा जोर कायम राहिल्याने अंबा नदीच्या पात्रात वाढ होत गेल्याने आज सकाळी नागोठण्यात हा पूर आला. या पुरामुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील छोटे व्यावसायिक व दुकानदारांची आपापले सामान सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी एकच धांदल उडाली. या भागातील नागरिकांना व दुकानदारांना या पूराच्या पाण्यामुळे खुप त्रास सोसावा लागला. विशाल मेडिकल समोर असणार्या मिनिडोर रिक्षा स्टँडच्या परिसरात तसेच नागोठणे एस.टी.बस स्थानकासामोरील परिसरात पूराचे पाणी आल्याने याचा वाहतूकीवर परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले.

याशिवाय कोरानाच्या पार्श्‍वभूमीवर नागोठण्यात दर शनिवार-रविवारी करण्यात येत असलेल्या विकेंड लॉकडाऊन नंतर सोमवारी सकाळी परिसरातील जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना व दुकानदारांनाही याचा फटका बसला. तसेेच यावेळी नागोठणे येथून कामानिमित्त ये जा करणारे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. या आलेल्या पुरामुळे एस.टी.स्थानकात येणार्‍या गाड्यांना काही काळ नागोठणे येथील मुंबई गोवा महामार्गावर थांबावे लागले होते. तसेच पूर आलेल्या परिसरातील सर्वांनाच या पूराच्या परिस्थितीचा सामना करावा लागला.

नागोठणे येथील मुख्य बाजार पेठ, कोळीवाडा परिसरातील दुकानदार व नागरिक सतर्क राहिले होते. या पूराच्या पाण्यामुळे आंबा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने नागोठणकडून वरवठणे गावाकडे जाणारा रस्ताही यावेळी या पूराच्या पाण्यामुळे पूर्णपणे बंद झाला होता. आंबा नदीला आलेल्या या पुरामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पुर्णपणे बंद होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी नागोठणे पोलीस ठाणे, ग्रामपंचायत प्रशासन व महसूल खाते यांच्याकडून पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत होते.

Exit mobile version