नवसाला पावणारी भिसेगावची अंबेभवानी

। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत रेल्वे स्थानकापासून अगदी दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भिसेगावमध्ये अंबेभवानी मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारी जागृत देवस्थान अशी या स्थळाची प्रचिती आहे. या देवीबद्दल उपलब्ध असलेली माहिती अशी की, कर्जत नगरपरिषद हद्दीत असलेले भिसेगाव हे गाव भिसे खिंडीच्या पायथ्याशी आहे. पूर्वी या ठिकाणी खूप जंगल होते. व्यापारी वर्ग व्यापारासाठी मुंबई-पुण्याकडे जाताना याच खिंडीच्या मार्गाने जात. हे व्यापारी खिंडीजवळ असणार्‍या विहिरीजवळ रात्री मुक्काम करून सकाळी पुढील प्रवासाला निघत. डोंगर माथ्यावर आदिवासी लोकांची वस्ती होती.

एके दिवशी एका गुजराथी व्यापार्‍याला मुक्कामाला असतांना स्वप्न पडले. स्वप्नात देवीने दर्शन दिले. ’मी या विहिरीजवळ असलेल्या वारुळात आहे. मला त्यातून बाहेर काढ. माझ्या सोबतीला एक काळा नाग आहे. तो तुम्हाला काही करणार नाही. या स्वप्नाकडे लक्ष न देता तो व्यापारी तेथून पुढे निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा या ठिकाणी तो व्यापारी मुक्कामास आला असता त्याला तसाच दृष्टांत झाला. हा सर्व वृत्तांत त्याने आपल्या व्यापारी मित्रांना सांगितला.

या सर्व व्यापारी वर्गाने मिळून स्वप्न शोधण्याचे ठरविले. त्यांनी डोंगर माथ्यावर राहणार्या आदिवासींना मदतीला बोलून घेतले. सार्वजण वारूळ फोडण्यासाठी जमले असता त्या वारुळातून काळा नाग बाहेर आला व कुणालाही काहीही न करता बाहेर निघून गेला. त्यानंतर आदिवासी लोकांनी वारूळ फोडले. तो काय आश्‍चर्य, खरोखर देवीची सुंदर रेखीव मूर्ती त्यातून बाहेर पडली. ती मूर्ती पाहून सर्वांना आनंद झाला. आदिवासी व व्यापारी यांनी सावली म्हणून देवीच्या डोक्यावर छप्पर तयार केले. तेव्हापासून व्यापारी येता-जाताना देवीची पूजा करून दर्शन घेऊन आपापल्या कामाला जात असत.

ही देवी कोणती? असा प्रश्‍न कुतुहलापोटी लोकांमध्ये निर्माण होऊ लागला. तेव्हा ज्या आदिवासी माणसाने वारुळास प्रथम हात लावला त्याच्या स्वप्नात जाऊन देवीने सांगितले की, मी गुजराथ येथील अबुच्या पहाडावरील श्री अंबे भवानी आहे. तेव्हा पासून या देवीला अंबेभवानी माता असे लोक म्हणू लागले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला असून, आता मोठा सभा मंडप उभारून गोर गरीब लोकांच्या शुभ कार्याची व्यवस्था केली आहे.

Exit mobile version