। श्रीवर्धन । वार्ताहर ।
1968 ते 1972 या कालावधीत महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये शिकलेल्या मुला-मुलींचा प्रथम स्नेह मेळावा महाड नगर परिषदेच्या संत शिरोमणी श्री.रोहिदास सभागृहात उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
मेळाव्यासाठी पुणे, बडोदा, मुंबई, पेण, पनवेल, भोर, माणगाव, गोरेगाव, श्रीवर्धन इ.ठिकाणांहून मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. नावनोंदणी, स्वागत, अल्पोपहार झाल्यावर रत्नप्रभा शिंदे, उषा दोशी आदिंनी केलेल्या श्री गणेश पूजनाने मेळाव्याचा श्री गणेशा झाला. कार्यक्रमाचे उत्साही सदस्य गजानन तथा आबा धारप यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. प्रथम सर्व दिवंगत सदस्यांना भावपूर्ण श्रदांजली वाहिल्यावर सर्वांनी आपला परिचय करुन दिला. यावेळी उपस्थितांपैकी काही जणांनी आपली स्वरचित काव्ये, गझला, विडंबन काव्ये, गाणी, स्वानुभव इ. सादर करुन आपल्यातील अंगभूत गुणांची ओळख करुन दिली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्याच्या समारोपाआधी दर वर्षी असा स्नेह मेळावा घ्यायचाच असे ठरवून तो पुढील वर्षी शक्य झाल्यास भोर येथे घ्यावा असे मत पडले.