। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर येथील महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी (दि. 24) घडली आहे. स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दाभीळ गावाजवळ कार दरीत कोसळली आहे. या अपघातात कोकणात सहलीसाठी आलेल्या, सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त गाडीतील मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथून 18 ते 30 वयोगटातील तरूण शुक्रवारी सहलीसाठी कोकणात आले होते. दापोलीतील हर्णे येथून हे सर्वजण रविवारी परतीच्या मार्गावर निघाले होते. मात्र, आंबेनळी घाटात दाभीळ गावाजवळ त्यांची गाडी आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी खोल दरीत कोसळली, सातशे ते आठशे फूट खोल जाऊन ही गाडी आपटली. दुर्घटना इतकी भीषण होती. की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत गाडीतील सर्व प्रवाश्यांचा मृत्यू झाला.
पहाटे तीन साडे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्रीचा अंधार आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती यामुळे मदत व बचाव कार्यात मोठी आव्हाने येत होती. घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्यासह सह्याद्री ट्रकर्स, प्रातापगड सर्च अँण्ड रेस्कू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि महाड येथील सिस्केप संस्थेची बचाव पथक आणि पोलादपूर येथील स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी रात्रीच दरीत उतरून अपघातग्रस्त गाडीचा शोध घेतला. पण गाडीत सर्व प्रवाश्यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. बचाव पथकांनी दोरीच्या साह्याने स्ट्रेचर बांधून अपघातग्रस्त युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. या दुर्घटनेमुळे पोलादपूर महाबळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहिती नुसार मृतामध्ये महेश पवार (25), आदित्य साळुंखे (21), रितेश लोखंडे (25), सुहास लोखंडे (20), अंश चव्हाण (18), उत्कर्ष शिंगटे (21), अनिल शिंगटे (25), नितीन नायकोंडे (35) यांचा समावेश आहे. हे सर्वजण कोरेगाव तालुक्यातील आसगाव गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.






