आंबेनळी घाट पंधरा दिवस बंद

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी शनिवारी (दि.29) ते पुढील पंधरा दिवसांकरिता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक रायगड-अलिबाग यांच्या पत्रानुसार आंबेनळी घाट रस्ता हा अरूंद व घाट वळणाचा असल्याने रस्त्याचे बाजूला असणारा डोंगरकडा हा या भागात पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन होवून डोंगरावरील माती व मोठमोठे दगड रस्त्यावर आल्याने, तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने हा घाट रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या रस्त्यावरून वाहतूक सुरू ठेवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवून मोठया प्रमाणांत जिवित व वित्तीय हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्या कारणास्तव हा रस्ता बंद करण्यात येऊन पर्यायी रस्ता पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर, तसेच पाटणकडून सातारामार्गे पुण्याकडे असा पर्यायी मार्ग आहेत, असे अभिप्राय सादर केले आहेत.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावरील कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी पुढील पंधरा दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंदी आदेश जारी केला आहे.

Exit mobile version