आज रोह्यात बैठक
आ. जयंत पाटील यांनी अधिवेशनात वेधले होते लक्ष
| रोहा | प्रतिनिधी |
कोलाड पाटबंधारे विभागातील आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याची साफसफाई करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत शेकापचे आ. जयंत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणाने या कालव्याची साफसफाई झाली नसल्याची कबुली दिली होती.त्याचबरोबरच लवकरच या कालव्याची साफसफाई, दुरुस्ती करुन पाणी सोडण्याचे आश्वासनही दिले होते.त्याची दखल घेत रोहा तालुका प्रशासनाने कालव्याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी (10 जानेवारी) तहसील कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालव्यातून पाणी न सोडण्यात आल्याने रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या डाव्या व उजव्या तीरावरील बागायती, भाजीपाला शेती, फळ लागवडीवर विपरित होत आहे. कालव्यामध्ये त्वरित पाणी न सोडल्यास शेतकर्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. मे महिन्यात पाण्याअभावी गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते तसेच बागायती, भाजीपाला शेतीदेखील पाण्याअभावी सुकत आहे, असे वास्तव आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळात मांडले होते.
समन्वय समिती आक्रमक
कालव्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी समन्वय समितीने मोर्चा आंदोलनासह आमरण उपोषणाचे हत्यार उपसताच पाटबंधारे प्रशासन कधी नव्हे ते भानावर आले. त्यातच ग्रामस्थांच्या न्याय्य आंदोलनाची दखल घेत तहसीलदार कविता जाधव यांनी दालनात पाटबंधारेचे अधिकारी व समन्वय समितीची बैठक घेतली. त्या बैठकीत डिसेंबरअखेर कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाने दिले. मात्र, अजूनतरी कालव्याच्या साफसफाई मुख्यतः दुरुस्ती कामाला जलदगतीने प्रारंभ नाही. अनेक ठिकाणचे महत्त्वाचे लिकेज सायपन दुरुस्ती होणार कधी, कालव्याला पाणी सोडणार कधी याच प्रतीक्षेत अखेर कालव्याच्या साफसफाईला मुहूर्त मिळाल्याची बाब समोर आली आहे. त्याच अनुषंगाने आता मंगळवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यामुळे यंदा तरी कालव्यातून पाणी सुटेल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगुन आहेत.
बैठकीत कोणता फैसला होतो याकडे निवी ते आंबेवाडी भागातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने शनिवारपासून कालवा सफाईला सुरुवात केली असली तरी निवीपर्यंत पाणी कधी व कसे पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, कालव्याच्या साफसफाईला प्रारंभ केला आहे, अशी माहिती अभियंता गोरेगावकर यांनी दिली.