चिल्हार नदीला पूर
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील आंबिवली येथील तलाव फुटल्याने चिल्हार नदीला अचानक पूर आला असून, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. या घटनेमुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंबिवली येथील तलाव अतिवृष्टीमुळे मध्यरात्री फुटल्याने अचानकपणे चिल्हार नदी तुडुंब भरून वाहू लागली. तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे टेंभरे व कशेळे मार्गावरील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अचानक आलेल्या पुराचा फटका आंबिवलीसह धोत्रे, शिलार, अकॅडमी, किकवी, सुगवे, लोभेवाडी, अंतराट, गुडवण, चोरवले, पिंपळोली आदी गावांना बसला. अनेक ठिकाणी पाणी शेतांमध्ये घुसल्याने भात लागवडीचे मोठे नुकसान झाले आहे. तलावातील गाळ आणि माती शेतीत साचल्याने भाताची रोपे पाण्याखाली जाऊन चिखलात रुतून बसली आहेत. दरम्यान, आंबिवली बंधाऱ्यातील पाणी वनविहार परिसरातील पांडवकालीन लेण्यांमध्ये शिरल्याने संपूर्ण लेणी पाण्याखाली गेली आहेत.
