गुरांना राहिले नाही पाणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याच्या आदिवासी भागातून वाहणारी चिल्हार नदी उन्हाळ्यात कोरडी असते, मात्र त्या नदी मध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे साठे मे महिन्याअखेर शिल्लक असतात. यावर्षी उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने या नदीमधील पाण्याचे डोह कोरडे झाले आहेत, त्यामुळे गुरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान स्थानिक भागातील शेतकर्यांना आपल्या गुरांच्या पिण्याच्या समस्येने ग्रासले असून शासन आपली चिल्हार नदी बारमाही वाहती कधी करणार याकडे डोळे लावून बसले आहेत.
पेठ आंबिवली परिसरातून वाहणारी चिल्हार नदी कोल्हारे येथे उल्हासनदीला मिळते. उन्हाळ्यात ही नदी कोरडी राहत असल्याने या नदीवर शासनाने अनेक ठिकाणी कोल्हापूर टाईपचे बंधारे बांधले आहेत. त्यामुळे या नदीचं पात्रात काही ठिकाणी पाण्याचे डोह आहेत तेथे पाण्याचा साठा उपलब्ध असतो. त्या डोहातील पाण्याचा साठा साधारण मे अखेरपर्यंत उपलब्ध असतो. उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या चिल्हार नदीमध्ये ठराविक ठिकाणी असलेला पाण्याचा साठा हा त्या त्या भागातील शेतकर्यांच्या जनावरांसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका बजावत असतो. मात्र यावेळी वातावरणात असलेला प्रचंड उष्मा यामुळे चिल्हार नदी मधील पाण्याचे साठे आटले आहेत. पाण्याचे डोह यांची भूजल पातळी जमिनीच्या खाली गेल्याने नदीमध्ये सर्वत्र पाण्याचा खडखडाट दिसून येत आहे.
यावर्षी किमान महिनाभर आधी चिल्हार नदी कोरडी झाली आहे. त्यामुळ चिल्हार नदीच्या आजूबाजूला असलेल्या गावातील शेतकरी संकटात आले आहेत. तालुक्यातील बहुसंख्य पशुधन हे चिल्हार नदीच्या आजुबाजुंच्या गावातील शेतकर्त्यांकडे आहे. मात्र त्या भागातील शेतकरी यांना कंदील पशुधनाला पिण्याचे पाणी कुठून आण्याचे असा प्रश्न पडला आहे. चिल्हार नदीच्या आजूबाजूला पिंपळोली, वाकस, बोरिवली, पाथरज, कशेळे या ग्रामपंचायत मधील शेतकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या जनावरांना कुठे न्यायाचे असा प्रश्न सतावत आहे. बैलगाडीवर पाण्याचे पिंप ठेवून ती बैलगाडी वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी नेवून तेथून पाणी आणण्याची शेतकर्यांवर आली आहे. आम्ही आपली जनावरे यांना चिल्हार नदी कोरडी झाल्याने कुठे चरायला आणि पाणी पाजायला न्यायाचे असा प्रश्न पिंपळोली येथील ग्रामस्थ सुभाष काळण यांनी उपस्थित केला आहे.
बारमाही वाहती कधी होणार?
उन्हळ्यात कोरडी असलेली आणि तालुक्यातील दहा ग्रामपंचायत मधून जात असलेली चिल्हार नदी हि बारमाही व्हावी आणि या भागातील 50 हुन अधिक गावे आणि त्याहून अधिक आदिकवासी वाड्यांमधील पिण्याची पाण्याची टंचाई दूर व्हावी यासाठी चिल्हार नदी जोड प्रकल्प शासनाने करावा, अशी मागणी स्थानिक गेली अनेक वर्षे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. आता या नदी जोड प्रकल्पासाठी स्थानिक तरुणांनी मोठा लढा उभारला आहे. गावोगावी जनजागृती करण्याचे काम केले आहे, मात्र शासनाला काही पाझर फुटत नाही. नुकतेच या फॉर्म मधील राजेश भोईर आणि काशिनाथ रसाळ या कार्यकर्त्यांनी राज्याचे रवींद्र चव्हाण यांच्याकडे अर्ज देऊन आपला प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.