भीम अनुयायांची आक्रोश मोर्चाद्वारे मागणी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे जे वक्तव्य केले आहे त्याचा जाहीर निषेध, तसेच परभणी जिल्ह्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करणार्या दोषींना त्वरित ताब्यात घ्यावे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार पोलीस कर्मचारी, अधिकायांवर कठोर कारवाई करावी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे वक्तव्य करणार्या गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देशवासियांची त्वरित माफी मागावी, अशी जोरदार मागणी करीत सुधागड परळी येथील भीम अनुयायी, बहुजन समाज बांधवांनी रविवारी दि.(29) रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छ. शिवाजी महाराज की जय, भारतीय संविधानचा विजय असो व अमित शाह यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
संपूर्ण देशात ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निंदनीय वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहेत. देशाला स्वातंत्र्य होऊन जवळ जवळ 77 वर्षे झाली. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तीन सूत्रांवर आधारलेली आपली स्वतंत्र भारताची लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. गेल्या महिन्यातच आपण 74 वा ‘संविधान दिन’ साजरा केला. पण, हा संविधान दिन साजरा होत असताना, अनेकांच्या पोटात दुखू लागले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या भारताच्या राज्यघटनेने इथल्या प्रत्येक नागरिकाला एक भारतीय म्हणून ओळख तर दिलीच; पण त्याचबरोबर स्त्री, वंचित, शोषित वर्गाला समानतेचा अधिकार दिला. याच संविधानाच्या ताकदीने आज सर्वसामान्य व्यक्ती मोठमोठ्या पदावर विराजमान झाली आहे. अमित शाह यांनी ज्याप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान केले, तसे विधान यापुढे कोणीही करण्याआधी शंभर वेळा तरी विचार करावा. अन्यथा त्याचा परिणाम काय होईल, याची दखल घ्यावी, असा इशारा यावेळी उपस्थित भीम अनुयायांनी दिला. तर अमित शहा यांनी संपूर्ण देशाची त्वरित माफी मागावी तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या बांधवांची पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली, त्यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी उपस्थित परळी विभागातील भीम अनुयायी व बहुजन समाज बांधवांनी केली.
आज सुधागड तालुका बौद्ध समाज्याच्या वतीने निषेध रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी दिलीप जाधव, चंद्रकांत साळुंखे, अशोक वाघमारे, किरण गायकवाड, दिपक पवार, अमित गायकवाड, अशोक कांबळे, रमेश साळुंखे, राहुल गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय गायकवाड, नारायण जाधव, राजेश गायकवाड, कृष्णा गायकवाड, रुपेश साळुंखे, मारुती साळुंखे, भगवान वाघमारे, भागवत गायकवाड, मनोज मोरे, रोहिणी जाधव, नंदिनी मोरे आदींसह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.