| शिरुर | प्रतिनिधी |
शिरूर लोकसभेत अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव यांच्यात आव्हान-प्रतिआव्हानाची लढाई सुरू आहे. याच प्रसंगी कोल्हेंना दुसऱ्यांदा खासदार होऊ देणार नाही, असे आव्हान अजित पवारांनी दिले आहे. अशातच अजित पवारांचे आव्हान स्विकारणाऱ्या अमोल कोल्हेंनी आता दादांना प्रतिआव्हान दिले आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर नेता हवा की अभिनेता, असे म्हणणाऱ्यांनी आज उत्तर द्यावे, असे म्हणत कोल्हेंनी अजित पवारांना डिवचले आहे.
काही दिवसांपूर्वी आढरावांनी संसदेत शिरुरच्या जनतेचे प्रश्न न विचारल्याचा आरोप कोल्हेंनी केला होता. त्यावर पुरावे द्या, मी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतो, असे आव्हानही कोल्हेंना आढळरावांनी दिले होते. लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडण्याचा शब्द पाळणार का? याची आठवण कोल्हेंनी आढळरावांना आजच्या सभांप्रसंगी करून दिली आहे. यासाठी आढळरावांच्या डायनालॉग कंपनीला आणखी एक पुरावा त्यांनी व्हिडीओमध्ये सादर केला आहे. 29 एप्रिल 2016रोजी आढळरावांनी विचारलेल्या प्रश्नाचा मुद्दा आता कोल्हेंनी छेडलाय. हा प्रश्न ही संरक्षण विभागाशी संबंधित असल्याचा आणि यातून आढळरावांनी स्वतःच्या कंपनीचं हित साधल्याचा दावा कोल्हेंनी केला आहे. पहिल्या पुराव्याचा आणि माझ्या कंपनीचा संबंध नाही, असं आढळराव म्हणाले होते. त्यानंतर कोल्हेनी दुसरा पुरावा दिलाय, आता आढळरावांनी निवडणुकीतून बाहेर पडण्याचा शब्द पाळावा, असं कोल्हेंनी आवाहन केल आहे. सोबतच ‘नेता हवा की अभिनेता’ हा प्रश्न विचारणाऱ्यांना याची कल्पना आहे का? असेल तर त्यांनी ‘उद्योगपती हवा की सर्व सामान्यांचे प्रश्न विचारणारा लोकप्रतिनिधी हवा’ याचं उत्तर द्यावं, असे आवाहन कोल्हेंनी अजित पवारांना केले आहे.