अवकाळीमुळे आमरस आंबट

| पनवेल | वार्ताहर |

उन्हाळ्यात आमरस खाण्याची मजा काही औरच असते; मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे आंब्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे खवय्यांसाठी आमरसाची चवही आंबट झाली आहे. आमरसाचे भाव वाढल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे मुंबईत पाहायला मिळत आहे. आंबा हे सर्वांचे आवडते फळ आहे. त्याच्यापासून बनणारे आमरस सर्वांनाच आवडते. त्यासोबतच आंब्यापासून आईस्क्रीम, आंबा शिरा, आंबा बर्फी, आंबा ज्यूस, आंबा मिल्कशेक असे असंख्य पदार्थ बनवले जातात. यामध्ये आमरस हा अधिक गुणकारी मानला जातो. त्यामुळेच उन्हाळ्यात आमरसाला अधिक मागणी असते. सध्या मुंबईमध्ये अस्सल आमरसाचे भाव 10 ते 20 टक्क्‌‍यांनी वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

आमरसाच्या किमती
मोठा ग्लास 260 ते 300 रुपये
लहान ग्लास 215 ते 230 रुपये
पायरी आमरस 260 रुपये किलो
हापूस आमरस 640 रुपये किलो

अवकाळीचा फटका
अवकाळी पाऊस व वादळ यामुळे मोहर गळून गेला आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याची आवक कमी झाली आहे. बाजारात दरवर्षी हापूस व विविध जातीच्या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र आवक कमी झाल्याने आंब्याच्या पाच डझन पेटीची किंमत 3500 ते 4500 पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे आंब्याच्या किमतीप्रमाणे आमरस खाणे महाग झाले आहे.

Exit mobile version