अमृत, महिला सन्मान योजना लालपरीसाठी संजीवनी

एसटीच्या तिजोरीत 12 कोटी जमा

| रायगड | खास प्रतिनिधी |

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या सर्वसामान्यांच्या लालपरीला (एसटी) विद्यमान सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे उभारी मिळू लागली आहे. एस.टी.महामंडळाच्या अमृत योजनेंतर्गत एप्रिल ते जून या कालावधीत रायगड विभागात 4 लाख 33 हजार 725 ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. त्यानुसार एसटी महामंडळाने 2 कोटी 2 लाख 27 हजार 430 अशी बक्कळ कमाई केली आहे. तर, महिला सन्मान योजनेर्तंगत 47 लाख 87 हजार 991 महिला प्रवाशांनी प्रवास केला. त्या माध्यमातून 10 कोटी 59 लाख 52 हजार 585 रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाच्या तिजोरीत जमा झाले आहे. या दोन्ही योजना एसटी महामंडळासाठी संजीवनी ठरल्याचे रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षापासून आपण ऐकत आहोत की, एसटी महामंडळ तोट्यात चालले आहे. एसटी हे सर्वसमान्यांच्या प्रवासाचे साधन आहे. खेड्यापाड्यातील कानोकोपऱ्यात एसटी आपली सेवा देत असल्याने ग्रामीण भागातील नागरीकांची जीवन वाहिनी बनली आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. नुकतीच राज्य सरकारने ज्येष्ठ नागरीकांसाठी अमृत योजना, तर महिलांसाठी 50 टक्के सवलतीची महिला सन्मान योजना सुरु केली आहे. या दोन्ही योजनांना राज्याच्या विविध भागांमध्ये उत्तम प्रतिसाद लाभत आहेत.

सकारात्मक ऊर्जा
समाजाचा एक महत्वाचा घटक असलेल्या ज्येष्ठांसाठीच्या अमृत मोफत प्रवास योजनेमुळे तसेच महिलांच्या सन्मानार्थ सुरु केलेल्या महिला सन्मान योजनेमुळे एस. टी. महामंडळाची प्रवासी वाहतूक बस पूर्ण क्षमतेने भरली जाते तसेच शासनाकडून मिळणाऱ्या परताव्यामुळे एस. टी. महामंडळाचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे. यातून एस. टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही उत्साह वृद्धींगत होत असून एस.टी. प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी त्यांनाही मानसिक बळ मिळत आहे. यातून एक सकारात्मक उर्जा निर्माण होवून एस.टी. महामंडळ आणि प्रवासी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वय वर्ष 75 व त्या पुढील वयाच्या नागरिकांसाठी राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या माध्यमातून अमृत मोफत प्रवास योजना आणि महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत असलेली महिला सन्मान ही महिला विशेष अशा दोन स्वतंत्र योजना सुरु केल्या. या योजनांना संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनांमुळे राज्य परिवहन महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे. या योजनांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या तिजोरीत भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे.

ठळक बाबी
अमृत योजनेच्या माध्यमातून एप्रिल महिन्या मध्ये तब्बल 1 लाख 51 हजार 701 इतक्या ज्येष्ठनागरिकांनी प्रवास केला. त्यातून 62 लाख 88 हजार 637 रुपयांचे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात 1 लाख 54 हजार 115 जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला. यातून राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाला 71 लाख 51 हजार 256 एवढे उत्पन्न मिळाले. जून मध्ये 1 लाख 47 हजार 909 इतक्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आणि त्यातून 67 लाख 87 हजार 537 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

महिला सन्मान योजनेंतर्गत प्रवास भाड्यातील 50 टक्के सवलतीमुळे महिला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल 2023 मध्ये 15 लाख 32 हजार 880 इतक्या महिला प्रवाशांनीया योजनेचा लाभ घेतला. यातून 3 कोटी 16 लाख 48 हजार 613 उत्पन्न मिळाले. मे महिन्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढून ती 17 लाख 70 हजार 45 झाली. त्यातून 4 कोटी 17 लाख 17 हजार 410 रुपयांचे उत्पन्न मिळाले. जून महिन्यामध्ये 14 लाख 85 हजार 66 महिलांनी प्रवास केला. त्यातून 3 कोटी 25 लाख 86 हजार 562 इतके उत्पन्न प्राप्त झाले.

Exit mobile version