विनोद मोरे यांच्या कार्याचा सन्मान
| माणगाव | प्रतिनिधी |
एखादा कर्मचारी कार्यालयीन वेळ संपली की आपले कर्तव्य संपल्याचे मानतो. पण काही माणसे अशी असतात की त्यांच्यासाठी घड्याळाचे काटे, दिवस-रात्र, पाऊस-वारा किंवा स्वतःचा थकवा यांना काहीच महत्त्व नसते. जनतेच्या चेहऱ्यावरचा दिलासा आणि अंधारात बुडालेल्या घरात पुन्हा उजेड पाहण्याचे समाधान हेच त्यांच्या कामाचे खरे बक्षीस असते. माणगाव शहरातील नाणोरे येथील महावितरणमधील कर्तव्यदक्ष कर्मचारी विनोद मोरे यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात याच सेवाभावाचे जिवंत उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा, प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा गौरव करणाऱ्या शेकडो शुभेच्छा आणि कृतज्ञतेच्या संदेशांनी समाजमाध्यमे भरून गेली आहेत. अनेकांनी त्यांना “कर्तव्याचा खरा योद्धा”, “जनतेचा आधारवड” आणि “अंधारात उजेड घेऊन धावणारा देवदूत” अशा शब्दांत अभिवादन केले आहे.
वीजपुरवठा खंडित होणे म्हणजे केवळ दिवे बंद होणे नव्हे; तर एखाद्या घरातील आजारी व्यक्तीची चिंता, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण, शेतकऱ्यांच्या मोटारी बंद पडणे, लहान मुलांचा त्रास आणि व्यापाऱ्यांचे नुकसान. अशा प्रत्येक संकटाच्या क्षणी नागरिकांचा एक फोन आला की, विनोद मोरे क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पोहोचत असत. मुसळधार पावसात, काळ्याकुट्ट अंधारात, वादळी वाऱ्यांमध्ये किंवा मध्यरात्रीही त्यांनी कधीही कर्तव्यापासून पाऊल मागे घेतले नाही. अनेकदा विशेषतः पावसामुळे पुरपरीस्थितीत आपल्या जीवाला धोका असतानाही त्यांनी खांबावर चढून, तुटलेल्या तारा दुरुस्त करून आणि बिघाड शोधून वीजपुरवठा सुरळीत केला. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही तक्रारीचा भाव नव्हता. नागरिकांचे “धन्यवाद” आणि घराघरात पुन्हा लागलेला दिवा हेच त्यांच्या मेहनतीचे सर्वात मोठे पारितोषिक होते.
आज सामाजिक माध्यमांवर त्यांच्या कार्याचा होत असलेला गौरव हा केवळ एका कर्मचाऱ्याच्या सेवेचा सन्मान नाही; तर निस्वार्थ लोकसेवा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या मूल्यांचा गौरव आहे. आजच्या स्वार्थी आणि स्पर्धेच्या युगात प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा हीच खरी संपत्ती असल्याचे विनोद मोरे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. त्यांनी आपल्या कर्तव्याच्या प्रकाशाने असंख्य घरांमध्ये उजेड दिला, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हजारो नागरिकांच्या मनात विश्वास, आपुलकी आणि माणुसकीचा दिवा कायमचा प्रज्वलित केला. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घेतला, तर समाजात कर्तव्य, सेवा आणि संवेदनशीलतेचा प्रकाश अधिक तेजाने झळकत राहील, असे नागरिकांमधून बालले जात आहे.







