संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
| चिरनेर | प्रतिनिधी |
चिरनेर गावातील हायस्कूल ते कातळपाडा या मुख्य अंतर्गत रहदारीच्या महत्त्वपूर्ण मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील मुळपाड्यात जाण्याच्या श्री महागणपती प्रवेशद्वारची स्वागत कमान ते हजरत खलिल शहा बाबा मस्जिदपर्यंतच्या रस्त्याची जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पूरपरिस्थितीमुळे ही दुरवस्था झाली असून, हा रस्ता उखडून संपूर्ण खडी बाहेर आली आहे. तसेच, रस्त्याच्या एका बाजूची साईड पट्टी देखील वाहून गेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक व पादचाऱ्यांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या गंभीर प्रश्नाकडे एखादा अपघात होण्याआधी संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देणार का? असा सवाल येथील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
गेल्या कित्येक वर्षांत चिरनेर हायस्कूल ते कातळपाडा या रस्त्याची ठोस अशी दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे हा रस्ता कित्येक वर्षांपासून नादुरुस्त झालेला आहे. यंदा पहिल्याच पावसात या रस्त्यावर खड्डे पडले असून, रस्त्याची खडी बाहेर आल्याने वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्याचबरोबर या रस्त्यावर अंदाजे 15 ते 20 फूट उंचीचा पुल असून, पुलाचे लोखंडी रेलिंगही तुटून पडले आहेत. तसेच, या पुलालगतचा काही भाग खचल्यामुळे पुलावरचा प्रवास धोकादायक व असुरक्षित झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. हा रस्ता परगावातील गणेश भक्त, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, कामगार वर्ग, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसह गुराढोरांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या रस्त्याची पाऊस पडण्याआधीच दुरुस्ती झाली असती, तर या जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात अशी दुरवस्था झाली नसती. अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांमधून उमटत आहेत. तसेच, या रस्त्याच्या गंभीर प्रश्नाकडे संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देणार का? असा सवाल येथील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या नादुरुस्त रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील केली जात आहे.
हा रस्ता गणेशभक्त व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, हा रस्ता काही ठिकाणी अरुंद आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणचे वॉल कंपाऊंड थोडे सरकविण्यासाठी संबंधित मालकांना विश्वासात घेऊन रस्त्याची अडचण त्यांना समजावली जाणार आहे. जेणेकरून या रस्त्याचे कायमचे रुंदीकरण करता येईल.
भास्कर मोकल,
सरपंच, चिरनेर







