मालिका वाचवण्याचे आवाहन

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

एकदिवसीय मालिका व एकमेव कसोटी जिंकणार्‍या भारतीय महिला क्रिकेट संघाला पहिल्याच टी-20 लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले हाते. भारतीय संघासमोर दुसर्‍या टी-20 लढतीत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार. या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला या लढतीत विजय आवश्यक असून दक्षिण आफ्रिकेकडे ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी असणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामधील लढत रोमहर्षक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पहिल्या टी-20 लढतीमध्ये दोन्ही देशाला एक धक्का बसला. भारताची रिचा घोष व दक्षिण आफ्रिकेची ताझमिन ब्रिट्स यांना अनुक्रमे कनकशन व दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. झेल पकडायला गेली असताना रिचा घोषच्या चेहर्‍याला दुखापत झाली. रिचाची दुखापत स्कॅनसाठी पाठवण्यात आली असून बीसीसीआयची वैद्यकीय समिती या दुखापतीकडे लक्ष ठेवून आहे. ताझमिन ब्रिट्स हिच्या पायाला दुखापत झाली; पण आगामी लढतींमध्ये खेळणार असल्याचे स्वत:हून तिने सांगितले. त्यामुळे सध्या तरी दक्षिण आफ्रिकेसाठी चिंतेचा विषय नाही. दुसर्‍या सामन्यापूर्वी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, पहिल्या टी-20 लढतीत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो नाही. क्षेत्ररक्षण करताना झेल सोडले. यामुळे 20 धावांचा फटका बसला. फलंदाजी करताना निर्धाव चेंडू घालवले. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी अचूक टप्प्यात गोलंदाजी केली. आम्हाला धावा करण्यासाठी मोकळीक दिली नाही.

Exit mobile version