| चेन्नई | वृत्तसंस्था |
सलामीच्या लढतीत चीनचा 7-2 असा धुव्वा उडवणार्या यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी या हॉकी स्पर्धेतील शुक्रवारच्या लढतीत जपानविरुद्ध 1-1 अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. जपानकडून केन नागायोशी याने 28 व्या मिनिटाला गोल करीत भारताला धक्का दिला. जपानने ही आघाडी 42व्या मिनिटांपर्यंत कायम ठेवली. हरमनप्रीत सिंगने 43 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. भारताचा पुढील सामना आता मलेशियाशी, तर जपानचा पाकिस्तानशी होणार आहे.
पाकिस्तानच्या हॉकी संघाने गतविजेत्या दक्षिण कोरिया हॉकी संघाला 1-1 अशा बरोबरीत रोखले. शाहीद अब्दुल याने शानदार फिल्ड गोल करीत पाकिस्तानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये दक्षिण कोरियाने बरोबरीचा गोल केला. यांग झिहून याने पेनल्टी स्ट्रोकवर दक्षिण कोरियाला बरोबरी साधून दिली. चीनच्या हॉकी संघाला प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सलग दुसर्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारताकडून त्यांना सलामीच्या लढतीत 7-2 असे पराभवाला सामोरे जावे लागले होते. मलेशियाने शुक्रवारी त्यांचा 5-1 असा धुव्वा उडवला.