अहमदाबाद विमानतळावर घातपाताचा कट उधळला

आयएसआयएसच्या 4 दहशतवाद्यांना बेड्या; चौघेही श्रीलंकन

। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।

अहमदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत.

गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने श्रीलंकेतून दहशतवादी पाठवण्यात आले होते. ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुजरात एटीएसने मिळालेल्या माहितीच्या आधारावर चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. दहशतवाद्यांना टार्गेट लोकेशनवर पोहचण्याआधीच ताब्यात घेण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेले चारही पाकिस्तानमधील हँडलरच्या संपर्कात होते. त्यांनी मोठा कट आखला होता. हे दहशतवादी पाकिस्तानातील आदेशाची वाट पाहत होते, असेही समोर आले आहे. या दहशतवाद्यांना शस्त्रेही स्वतंत्रपणे पोहोचवली जाणार होती. एटीएसने या दहशतवाद्यांच्या फोनमधून एन्क्रिप्टेड चॅट जप्त केले आहेत. एटीएसकडून चारही दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. चॅट्समधून बरीच माहिती उघड झाली आहे.

गुजरात पोलिस अलर्ट मोडवर
सुरत पोलिसांकडून मौलवी सोहेल अबुबकरच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यावेळीच गुजरातमध्ये चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पण हे दहशतवादी अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. गुजरात पोलिसांकडून सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या आहेत. बारकाईने सर्व ठिकाणी लक्ष देण्यात येत आहे.
Exit mobile version