| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील वाजे गाव येथील अर्पिता या अभिनेता सलमान खान याच्या फार्महाऊसमध्ये बेकायदा घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना तेथील सुरक्षारक्षकांनी पकडून पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांकडे बनावट आधार कार्ड सापडले असून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
अजेशकुमार ओमप्रकाश गिल (वय 23) आणि गुरुसेवकसिंग तेजासिंग सीख (वय 23) अशी त्यांची नावे असून त्यांची चौकशी सुरू आहे. दोघांनी आपली खोटी नावे महेशकुमार रामनिवास व विनोदकुमार राधेशाम असल्याचे तसेच ते उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचे सांगितले होते. मात्र, संशय आल्याने पनवेल तालुका पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली खरी नावे सांगितली. त्यानंतर त्यांच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता दोघांनी आपले छायाचित्रे वापरून बनावट नावाने आधार कार्ड बनवल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. सलमान खान याला भेटण्यासाठी त्यांनी हा खटाटोप केल्याचे चौकशीत सांगितले.






