। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरांमध्ये भर लोकवस्तीत दिवसाढवळ्या एका 25 वर्षीय तरुणीवर एका कामगाराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अलिबागमधील प्रसिद्ध वकील ॲड. संतोष म्हात्रे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले असून अलिबाग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा कामगार आहे. शनिवारी (दि. 12) सकाळी शहरातील कामत आळी येथील एका झेरॉक्स सेंटरजवळ 25 वर्षीय तरुणी होती. ती एकटी असल्याचा फायदा घेत त्या कामगाराने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ॲड. संतोष म्हात्रे यांच्या निर्दशनास आला. त्यांनी त्या कामगाराला रोखून सतर्कता दाखवत तात्काळ अलिबाग पोलिसांना पाचारण केले. पोलीस हवालदार ज्योत्स्ना मासे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून काही तासातच दोषारोप पत्र तयार करण्यात आले.







