तोतया पोलिसांचा लुबाडण्याचा प्रयत्न फसला

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलमधील दोन भामट्यांकडून पोलीस असल्याची बतावणी करून खांदा कॉलनीतील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लुबाडण्याच्या प्रयत्न करण्यात आला. त्यापैकी प्रदीप बापुराव पाटील (40) असे एका तोतया पोलिसाचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर, पसार झालेल्या त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खांदा कॉलनी येथील शांतराम मोरे (71) हे पनवेल बस स्थानकावर गेले होते. तेथे एका भामट्याने त्यांचा पाठलाग करत पोलीस असल्याचे सांगत त्यांना रस्त्यात अडवले. त्यानंतर त्याने मोरे यांच्यावर चोरीचा संशय घेत त्यांना दमात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा दुसरा साथीदार आल्यानंतर त्याने देखील पोलिसांचा मोठा साहेब असल्याचे सांगून मोरे यांच्याकडील ओळखपत्रे त्यांच्याकडे घेतली. त्यानंतर या दोघांनी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी करून बाँड पेपर लिहून द्यावे लागेल, असे बजावले. मात्र, मोरे यांनी पैसे नसल्याचे सांगितले असता दोघा भामट्यांनी 25 हजार रुपये देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. यावेळी मोरे यांनी युक्ती लढवत त्यांना रिक्षामधून खांदा कॉलनीतील घराजवळ नेले. तेथे पोहोचल्यावर मोरे यांनी त्यांच्या मुलाला बोलावून घेतले. हे त्या भामट्यांच्या लक्षात येताच त्यांच्यातील एका भामट्याने तेथून पळ काढला. मात्र, प्रदीप बापुराव पाटील नावाचा दुसरा भामटा त्यांच्या हाती लागला. त्याला मोरे यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

Exit mobile version