| चिरनेर | प्रतिनिधी |
चिरनेर येथील रिक्षाचालक श्याम चौलकर यांना त्यांच्या प्रवासी रिक्षात सापडलेला मोबाईल संबंधित व्यक्तीला खात्री करून चिरनेर पोलीस चौकीतील पोलिसांच्या समक्ष परत केला. त्यामुळे या प्रामाणिक रिक्षा चालकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रिक्षाचालक श्याम चौलकर हे बुधवारी (दि. 3) आपल्या नेहमीच्या चिरनेर, कोप्रोली, उरण मार्गावरील प्रवाशांना घेऊन जात असताना, सायंकाळच्या सुमारास प्रवासी उतरल्यानंतर त्यांना रिक्षाच्या शीटच्याखाली मोबाईल पडल्याचे दिसून आले. तोपर्यंत रिक्षातील सर्व प्रवासी हे निघून गेले होते. त्यामुळे रिक्षा चालक शाम चौलकर यांनी आजूबाजूला असणाऱ्या प्रवाशांकडे चौकशी केली. मात्र, चौकशी करणाऱ्या प्रवाशांपैकी हा मोबाईल कोणाचाच नसल्यामुळे, त्यांनी जवळच असलेली चिरनेर पोलीस चौकी गाठली. यावेळी पोलिसांनी त्या मोबाईलद्वारे संपर्क साधला असता तो मोबाईल एका भारत सिंग या परप्रांतीय व्यक्तीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार त्या परप्रांतीय व्यक्तीला चिरनेर पोलीस चौकीत बोलावून, त्या व्यक्तीची पूर्ण खात्री करून त्याला त्याचा मोबाईल पोलिसांच्या समक्ष परत केला. मागील काही महिन्यांपूर्वी श्याम चौलकर यांना एका महिलेचे पॅनकार्ड, आरसी बुक, एटीएम कार्ड अशी तेरा प्रकारची महत्वाची कागदपत्रे व काही रक्कम असलेली लेडीज पर्स सापडली होती. मात्र, चौलकर यांनी ती महत्वाच्या कागदपत्रांची लेडीज पर्स संबंधित महिलेला पोलिसांच्या मदतीने परत केली. पोलीस कॉन्स्टेबल सचिन कडू पोलीस हवालदार केशव गदमले यांचेही याकामी सहकार्य लाभले. दरम्यान रिक्षाचालक शाम चौलकर यांच्या प्रामाणिकपणाचे चिरनेर गावासह उरण तालुक्यातही कौतुक होत आहे.
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
