| उरण | वार्ताहर |
गणेशोत्सवास अवघ्या दहा दिवसांचा कालावधी बाकी आहे. दरम्यान, चिरनेर कलानगरमधील मूर्तीकारांनी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींच्या जमान्यातही येथील कारागिरांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती करण्याची कला आजतागायत जिवंत ठेवल्याचे चित्र कलानगरात पहावयास मिळत आहे. पेणच्या गणेशमूर्ती कलेला तोडीस तोड देणारे चिरनेर कलानगरातील 22 कुंभार समाजाची कुंटुबं सुमारे 65 वर्षांपासून मातीबरोबर शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडविण्याचे काम करत आहेत.
कुंभार समाजाला शेती नसल्याने आपल्या कलेच्या पाठबळावर उन्हाळ्यात मातीची भांडी आणि गणेशमूर्ती, नवरात्रोत्सवात दुर्गामातेच्या मूर्ती घडवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. सध्या चिरनेर कलानगरमधील गजानन चौलकर, प्रसाद चौलकर, नंदकुमार चिरनेरकर, रमेश म्हशीलकर, दामू अण्णा चौलकर, प्रकाश चिरनेरकर, नारायण चौलकर, भालचंद्र हातनोलकर, उरण तालुका कुंभार समाज अध्यक्ष विष्णू चौलकर, विलास हातनोलकर, रंगनाथ चौलकर, भाई चौलकर, दिपक गोरे, नरेश हातनोलकर, नारायण हातनोलकर या मूर्तीकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न घडविता पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्ती घडविण्याच्या कामांना प्राधान्य दिले आहे.
चिरनेर कलानगरामधील मूर्ती कलेला जागेचा अभाव व आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे मर्यादा पडल्या आहेत, असे मूर्तीकार प्रसाद चौलकर यांनी सांगितले. तसेच शाडूच्या मातीत व रंगाच्या किमतीत होणारी वाढ यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यात सातत्याने खंडित होणारा विद्युत पुरवठा यामुळेही त्रास सहन करावा लागत आहे. तरी ही आज प्रत्येक कारखान्यात मूर्ती कारागीर शाडूच्या मूर्तीच्या 75 ते 250 लहान मोठ्या मूर्ती घडविण्याचे काम करत असल्याचे चौलकर म्हणाले. चिरनेर कलानगरातील घडविण्यात येणाऱ्या मूर्ती उरण, पनवेलबरोबर नवी मुंबई, ठाणे, मुंबईसारख्या शहरात गणेशभक्त घेऊन जात आहेत. गावातील खड्डे युक्त रस्त्यांचा त्रास गणेशभक्तांना सहन करावा लागत आहे, असे चौलकर यांनी सांगितले.
स्थानिक ग्रामपंचायत, शासनाने मूर्ती कारागिरांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली तर कुंभार समाज पुढेही ही कला जिवंत ठेवेल. या कलेच्या पाठबळावर समाजाची उन्नती होईल.
प्रसाद चौलकर, मूर्तीकार