| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
राज्यात एकीकडे स्मार्ट मीटरवरून वाद पेटलेला असतानाच, श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावात महावितरणचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर आला आहे. अवघ्या 6 बाय 8 फूट आकाराच्या एका छोट्याशा वडापावच्या टपरीला तब्बल 5 हजार 050 रुपयांचे वीजबिल पाठवण्यात आल्याने टपरीधारक मारुती गोविंद पड्याळ पुरते हवालदिल झाले आहेत. संबंधित टपरीमध्ये केवळ दोन लहान एलईडी बल्ब आणि एक घरगुती छोटा फ्रीज सुरू असतो. टपरीतील आईस्क्रीमचा फ्रीज जून महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे. असे असताना महावितरणने जून महिन्यात तब्बल 344 युनिटचा वापर दाखवून 5 हजार 50 रुपयांचे देयक हातात टेकवले आहे. मे महिन्यात 1 हजार 500 रुपये आलेले बिल एकाच महिन्यात थेट 5 हजारांवर पोहोचल्याने हा स्मार्ट मीटरचा चमत्कार आहे की महावितरणचा गोलमाल, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वाढीव बिलाबाबत मारुती पड्याळ यांनी महावितरण कार्यालयात धाव घेऊन मीटरची तांत्रिक तपासणी व रीडिंग पडताळणीसाठी लेखी अर्ज दिला. मात्र, अर्जाची दखल घेऊन चौकशी करण्याऐवजी “बिल तर भरावेच लागेल” असा अघोरी सल्ला कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दिलासा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.







