। पेण । वार्ताहर ।
पेणमधील खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या रामवाडी कार्यालयात घुसून 3 आरोपींनी कर्मचार्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी दादासाहेब भाऊसाहेब सोनटक्के (वय 34, रा. 305, बी विंग युनाइटेड गॅलक्सी, रामवाडी, पेण, मुळ रा.पिंपळवाडी, ता.कर्जत, जि.अहमदनगर) हे खारभुमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग रामवाडी येथील कार्यालयात कामावर हजर होते. यावेळी सोमवारी (दि.4) दुपारी12.39 च्या सुमारास 3 आरोपींनी कार्यालयात येवून त्यांना बेदम मारहाण केली.
सन 2021 साली चेअरमन ज्ञानाई मजुर सहकारी संस्था मर्यादित सरेभाग, ता.पेण यांना फिर्यादींच्या कार्यक्षेत्रात येणार्या रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या किनारी असलेल्या निडीफाटा ते धोंडखार व पळस या कार्यक्षेत्रातील खारभुमी योजनेच्या नुतनीकरणाच्या व दुरूस्तीची कामे ऑनलाईन निवेदने सन 2019, 2020 साली दिले होते. ते काम संस्थेने पुर्ण केल्याने त्या कामाची रक्कम त्या संस्थेला अदा करण्यात आली होती. ती रक्कम त्या संस्थेला का दिली? कामाची निविदा भरण्यासाठी आम्ही खर्च केला आहे, असे म्हणून आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळी केली. तसेच त्यांना मारहाण केली. याशिवाय आरोपी नं. 3 ने दमदाटी केली. तसेच मोबाईल सोबत घेवून आरोपी निघून गेले. महत्वाची बाब म्हणजे यातील फिर्यादी दादासाहेब सोनटक्के हे अपंग असून कामाच्या बाबतीत चोख आणि नियमात चालणारे अधिकारी आहेत. त्यांच्या या नियमात वागण्याचाच त्रास अनेक ठेकेदारांना होत असल्याने मुदामहुन त्यांच्यावर हा राग काढला आहे.
याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक आरोपी प्राणनाथ भोईर यास अटक केले आहे. इतर दोन आरोपी सचिन पाटील आणि संतोष पाटील यांचा शोध पोलीस करत आहेत. अधिक तपास पोलीस निरिक्षक देवेंद्र पोल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद ढेबे करीत आहेत.