। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील वाकडाईनगर महिला मंडळ, नगरसेविका ममता थोरे आणि ग्रामीण विकास व रोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या सौजन्याने शुक्रवारी (दि.21) ‘एक संध्याकाळ महिलांसाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध गमतीशीर कार्यक्रमांचा महिलांनी मनमुराद आनंद लुटून नगरसेविका ममता थोरे यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.
नगरसेविका ममता थोरे यांचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांनी सलग तिसर्या वर्षी आपल्या संकल्पनेतून सुरू केलेल्या वाकडाईनगर येथे ‘एक संध्याकाळ महिलांसाठी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महिलांकरिता विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील सर्व विजेत्यांसाठी आणि सर्व उपस्थितांसाठी भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. सर्व महिला मंडळ यांच्या सहकार्याने व उपस्थितीत सलग तिसर्या वर्षी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्याने नगरसेविका ममता थोरे यांनी सर्वांचे मनःपूर्वक ऋण व आभार व्यक्त केले.