। कर्जत । प्रतिनिधी ।
रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या अति वापराने सर्वसामान्य जनतेला दुर्धर आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी जनतेचे हित लक्षात घेऊन आरोग्यवर्धक कृषीमाल उत्पादित करून कौटुंबिक डॉक्टरच्या धर्तीवर कौटुंबिक शेतकरी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशिद यांनी केले आहे.
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथी गृह सभागृहात अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकर्यांसाठी आयोजित ‘प्रशिक्षण व निविष्ठा वाटप’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सहयोगी संशोधन संचालक आणि भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे होते. व्यासपीठावर वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा पाटील उपस्थित होत्या. काशिद पुढे म्हणाले की, कोरोनासारख्या विपदेत फक्त कृषिक्षेत्रानेच देशाला तारले, हे स्पष्ट झाले असून भविष्यातही शेतीला पर्याय असणार नाही. शेतकर्यांनी समूह शेती, शेतकरी उत्पादक संघ स्थापून व्यावसायिक शेतीद्वारे अर्थार्जन करणे गरजेचे आहे. ‘आत्मा’ अंतर्गत शेतकर्यांच्या सहली कृषी विद्यापीठ दापोली येथे आयोजित करण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी मान्य केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर इतर मान्यवरांनी देखील मार्गदर्शन कले.