। कोर्लई । वार्ताहर ।
लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध उपक्रम राबविले जातात. समाजामध्ये वावरताना आपण समाजाचे देणे लागतो व समाजसेवा देखील एक व्रत आहे. असे भावपूर्ण उद्गार लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल अध्यक्ष डॉ.अॅड.के.डी. पाटील यांनी काढले आहेत. लायन्स क्लब अलिबाग-नागांव आणि लायन्स क्लब श्रीबाग सेंटीनिअल आयोजित माधवबाग व लायन्स हेल्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवेदरबेलीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माधवबागचे तज्ञ डॉ.अभिजित होटकर व लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या डॉ. ऋतुजा बेडेकर यांच्या टिमने आजुबाजूच्या परिसरातील लोकांची ईसीजी, रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, वजन, हार्ट रेट, (2) ऑक्सीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये 40 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर, 34 लोकांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी 4 मोतिबिंदू व 1 रेटीना रुग्ण आढळून आले आहेत. लायन्स क्लब हेल्थ फाउंडेशनच्या चोंढी येथील दवाखान्यात मोतीबिंदू व रेटिना रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे संदीप वारगे यांनी सांगितले.