पालीत रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

पालीतील स्वामी समर्थ नगर येथील हरी ओम वास्तू सोसायटीच्या रहिवाशांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इतिहास आणि संस्कृतीचा संगम साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्‌‍याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, आणि पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असून, दिवाळीच्या सजावटीत एक वेगळीच प्रेरणा मिळत आहे.

सदर प्रतिकृतीत रायगड किल्ल्यांचे दरवाजे, बालेकिल्ला, होळीचा माळ, राजसभा मंडप, आणि जगदीश्वर मंदिर यांचे अत्यंत बारकाईने आणि कलात्मकतेने दर्शन घडवले आहे. दिवाळीच्या पारंपरिक सजावटीला इतिहासाची जोड देत हरी ओम सोसायटीच्या तरुणांनी आणि ज्येष्ठांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे.
रायगड किल्ल्‌‍याच्या प्रतिकृतीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी या प्रतिकृतीला भेट देऊन फोटो, व्हिडीओ आणि सामाजिक माध्यमांवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Exit mobile version