आरोग्य सेवेत महत्त्वाचं स्थान

समुदाय आरोग्य अधिकार्‍यांची मेळाव्यातून एकजूट

| नेरळ | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना यांच्या रायगड जिल्ह्यातील सदस्यांचा मेळावा आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व समुदाय आयोग अधिकारी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील शासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळावा आणि कार्यशाळेसाठी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेतील आरोग्यवर्धिनी सल्लागार डॉ. सागर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे अध्यक्ष डॉ. रूपेश सोनावळे, कोषाध्यक्ष डॉ. महेश मोकल आदी प्रमुख उपस्थित होते. आरोग्य उपकेंद्रामध्ये भरीव कामगिरी करणार्‍या डॉ. स्नेहा कस्तुरे यांचा विशेष सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यशाळेत समुदाय आरोग्य अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई, डॉ. अशोक कटारे, जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील, डॉ. राजाराम भोसले, डॉ. रोशन पाटील हे उपस्थित होते.

याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये समुदाय आरोग्य अधिकार्‍यांनी अतिशय उत्तम आरोग्य सेवेच्या जोरावर आपलं महत्त्वाचं स्थान निर्माण केलेलं आहे. लहान बाळांपासून गरोदर माता व वृद्ध नागरिकांना अतिशय आपुलकीने सेवा देत आहेत. कोव्हिड काळातही कोव्हिड केअर सेंटर सांभाळून रूग्ण तपासणी, उपचार आदी प्रत्यक्ष सुविधा दिल्या आहेत. अशाच प्रकारची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता यावी आणि काम करताना येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी विचार विनिमय या बैठकीत करण्यात आला. मेळाव्याला संघटनेचे अमोल खैरनार तसेच तालुका आरोग्य अधिकारी पेण येथील डॉ. अपर्णा पवार, महाड येथील डॉ. नितीन बावडेकर, उरण येथील डॉ. ईटकरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व समुदाय अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version