आरोग्य सेवेवर परिणाम
अन्यथा 23 जानेवारीपासून बेमुदत काम बंद
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने त्रस्त झालेल्या राज्यातील 10 हजार समुदाय आरोग्य अधिकार्यांनी सोमवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले होते. रायगड जिल्हयात देखील 160 समुदाय आरोग्य अधिकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येते. आंदोलनात सहभागी झालेले जिल्हयातील सर्व समुदाय अधिकारी अलिबागमध्ये एकत्र आले. त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाबाहेर ठिय्या मांडला. आज दिवसभर गणवेश परीधान करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले.
समुदाय आरोग्य अधिकारी हे गेली सहा वर्षे ग्रामीण भागात काम करीत आहेत. कोरोना काळातही आम्ही जीवाची बाजी लावून चांगले काम केले आहे. आमच्या मागण्यांसंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनाही निवेदन देवून चर्चा करण्यात आली आहे. मात्र अद्याप यावर काहीही निर्णय शासनाने दिलेला नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले आहे.या उपरही सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर 23 जानेवारी पासून बेमुदत काम बंद करून मुंबईत आझाद मैदान इथं राज्यव्यापी आंदोलनात सर्व अधिकारी सहभागी होतील, असे महाराष्ट्र राज्य समूदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रुपेश सोनावळे यांनी स्पष्ट केले.
समुदाय आरोग्य अधिकार्यांना सेवेत कायम करून ब वर्ग अधिकार्यांचा दर्जा द्यावा, कामावर आधारित मोबदला रद्द करून सरसकट 60 हजार रुपये वेतन द्यावे, त्यांच्यासाठी निश्चित केलेले 23 इंडिकेटर रद्द करावेत, बदल्यांबाबतचे धोरण ठरवण्यात यावे, पती पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार, कुटुंबातील व्यक्तींचे आजार यांचा बदल्यांमध्ये विचार करण्यात यावा, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. शिवाय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कामात बढती देण्यात यावी, हार्ड एरिया अलाऊंस देण्यात येणार्या क्षेत्रांच्या यादीत शासन निर्णयानुसार क्षेत्रांचा समावेश करण्यात यावा, नियमानुसार भत्ते मिळावेत या मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत.
विविध संघटनांचा पाठिंबा
समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या आंदोलनाला विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. रायगड जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटना त्यांचया पाठीशी उभी राहिली आहे. समुदाय आरोग्य अधिकारयांचया मागण्या आणि आंदोलन योग्यच आहे. आमचा त्यांना संपूर्ण पाठींबा असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अमोल खैरनार यांनी सांगितले. नॅशनल इंटीग्रेटेड मेडीकल असोसिएशननेदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देवून बसलेल्या आंदोलकांची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, आरोग्य वर्धीनी सल्लागार डॉ. अशोक काटे यांनी भेट घेतली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रूपेश सोनावळे , उपाध्यक्ष डॉ. अनिकेत म्हात्रे व डॉ. स्नेहा मुस्तापूरे कोषाध्यक्ष डॉ. महेश मोकल यांच्याशी प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी आपल्या मागण्यांबाबत राज्य सरकारला कळवले जाईल असे आश्वासन दिले.