सैनिकांना पाठवल्या 19 हजार राख्या
। धाटाव । वार्ताहर ।
‘एक राखी देशासाठी’ उपक्रमाच्या माध्यमातून रायगडसह विविध जिल्ह्यामधून सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आपापल्या विभागात उपक्रमाची जनजागृती केली. या माध्यमातून सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या सैनिक बांधवांसाठी 19 हजार राख्या व शुभसंदेश पाठविले. सलग सातव्या वर्षी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने यशस्वीपणे हा उपक्रम राबविण्यात आला. सुराज्यचे कार्यकर्ते अनिकेत पाशिलकर व तुषार दिघे यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणून या उपक्रमाची यशस्वीपणे आपली भूमिका पार पाडली.
देशासाठी लढणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी मंच मिळावा व आपल्या भावना प्रेम व्यक्त करता यावे यासाठी हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी सुराज्य राबवत असते. यामध्ये राखी आणि संदेश विविध सैनिकांना पोहचल्यानंतर सदर सैनिक थेट नागरिकांना संपर्क करतात. रोहामधील रोहा शहर, कोलाड, वरसे, धाटाव, शेणवई, नागोठणे, मालसई, खारापटी, धामणसई, खांब, तिसे, चणेरा, मेढा तसेच जन शिक्षण संस्थान रायगड, प्रभाग क्र 8 मधील (रोहा) नागरिक व स्पंदन संस्था, सखी मंच, मनी वाइज रोहा, श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा, कोलाड-रोहा विविध बचत गट, तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट, विविध रेसिडेन्सी तसेच रोहा तालुक्यातील 60 पेक्षा अधिक शाळा आणि कॉलेजमधील युवती आदीनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. माणगाव, मुंबई, कोल्हापूर, ठाणे, सांगली, पनवेल, पेण, मुंबई येथील नागरिकही या उपक्रमात सहभागी झाले.
सुराज्य सामजिक प्रतिष्ठानचे रिद्धी बोथरे, मानसी जाधव, रिया कासार, दर्शना चव्हाण, वर्णीका वाकडे, विनित वाकडे, अथर्व लोहट, राहुल पोकळे, गणेश बागाव, शुभम पतंगे, परेश चितळकर, मोनिश भगत, सुमित खरात, रोहित खराडे, प्रविण ठमके, कुणाल आंबळे, पवन भगत, अनिल घरजाळे, कृष्णा गोमतांडेल, अथर्व जोशी, प्रसाद पाटुकले, कमलेश चांदेकर पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
रोहा पोस्ट ऑफिस मधील सर्व कर्मचारी वर्ग तसेच कळत नकळत रोहातील अनेक नागरिकांनी या उपक्रमासाठी चांगले सहकार्य केल्याची माहिती सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण कानडे व संस्थापक रोशन चाफेकर, महिला अध्यक्ष प्रिया जंगम यांनी दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.