। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत वैजनाथ येथे सद्गुरु श्री वामनराव पै यांचे जीवनविद्या मिशन विद्यापीठ आहे. याठिकाणी सध्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी काही महान अनुभूती यांना स्वतः संस्थेचे विश्वस्त प्रल्हाद पै यांच्या हस्ते गौरविले जात आहे. याठिकाणी नुकतेच नेरळ येथील माजी उपसरपंच, वृत्तपत्र विक्रेते बल्लाळ जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
समाजसुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जतमधील जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये दिनांक 24 ते 29 नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून हजारो शिष्यमंडळी सहभागी झाली होती. 24 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळच्या सत्रात ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, संगीत जीवनविद्या, दिव्य अनुभूती देणारी मानसपूजा, मानसिक शांतता देणारी शरीरसाधना, कृतज्ञतापूर्वक करण्यात आलेले गुरुपूजन अशा विविध उपक्रमांचे आयेजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जीवनविद्या मिशन संस्थेसाठी आयुष्यभर कार्य करणार्या काही खास लोकांना जीवनविद्या गौरव या पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ नामधारक दिलीप कुलकर्णी आणि ज्येष्ठ प्रबोधक विश्वनाथ कामत यांना या वर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर यासह नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, वृत्तपत्र विक्रेते, भजनात हातखंडा असलेले बल्लाळ जोशी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला आहे. जीवनात श्री प्रल्हाद पै यांच्या सारख्या अनुभूतींकडून सन्मान होत आशीर्वाद मिळणं हि महत्वाची बाब असल्याचे उद्गार यावेळी जोशी यांनी व्यक्त केले आहेत. दरम्यान याप्रसंगी नेरळ येथील विद्या मंदिर मंडळाचे विवेक पोतदार यांचादेखील सन्मान करण्यात आला.






