दहा वर्षाच्या आत इमारतीला भगदाड; मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
| अलिबाग | प्रमोद जाधव |
मागासवर्गीय घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा गाजावाजा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग कायमच करीत आला आहे. त्याच विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अंगणवाडीच्या दुरावस्थेबाबत हा विभाग अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. अलिबाग तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडी येथील अंगणवाडी जीर्णअवस्थेत असल्याचे उघड झाले आहे. इमारतीला ठिकठिकाणी भगदाड पडला आहे. दहा वर्षातच या इमारतीची दूरावस्था झाल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाचे पाणी या अंगणवाडीत शिरत असल्याने मुलांच्या शिक्षणाच्या मार्गाला जीर्ण झालेली इमारत आडकाठी येत असल्याचे दिसून येत आहे.
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडी आदीवासी समाजाची वस्ती आहे. दुर्गम, डोंगराच्या लगत ही वाडी आहे. या वाडीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात टीकून राहवी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मंजूर करून अद्ययावत अशी अंगणवाडी बांधण्यात आली. सहा लाख रुपये या अंगणवाडीच्या इमारतीसाठी खर्च करण्यात आला. 2015-2016 मध्ये या इमारतीचे बांधकाम होऊन तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही अंगणवाडी खुली करण्यात आली. आदीवासी मुलांना हक्काचे शैक्षणिक व्यासपिठ मिळाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तीन ते सहा वयोगटातील मुले या अंगणवाडी शिक्षण घेऊ लागली. विद्यार्थ्यांची बौध्दीक व शारीरीक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अद्ययावत अशा सर्व सोयी सुविधांयुक्त इमारतीमुळे विद्यार्थ्यांचा अंगणवाडीमध्ये येण्याचा कलही वाढला. मात्र, दहा वर्षातच या इमारतीला भगदाड पडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे.
अंगणवाडी मुख्य प्रवेशद्वारासमोरच भिंतीला तडा गेला आहे. आतील भागामध्येही भिंतीला तडे गेले आहेत. स्वयंपाक खोलीतील पत्रा तुटला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या खोलीत मोठ्या प्रमाणात शिरत असते. भिंतीला भगदाड पडल्याने पावसाचे आत शिरत आहे. त्याचा परिणाम मुलांना शिक्षण घेताना अडथळे निर्माण होत आहेत. भगदाड पडलल्या इमारतीमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या अंगणवाडीला भगदाड पडल्याने दंश करणारे प्राणी आतमध्ये घूसण्याचा प्रकारही घडत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बांधकाम केल्यावर कमीत कमी वीस वर्ष इमारत सुस्थितीत असणे आवश्यक असल्याचा दावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुचिक यांनी केला आहे. मात्र, अवघ्या दहा वर्षाच्या आतच इमारत जीर्ण अवस्थेत झाली आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या कामाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची चर्चा सुरू आहे.
दहा वर्षात इमारतीला भगदाड पडणे योग्य नाही. बांधकाम केल्यावर साधारणतः वीस ते 25 वर्षे इमारत सुसज्ज असणे आवश्यक आहे. धोकादायक इमारती असल्यास मुलांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करा, अशा सुचना यापुर्वी दिल्या होत्या. परंतु महाजने येथील दिवीवाडी अंगणवाडीमधील शाळेच्या जीर्ण अवस्थेबाबत पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या जातील. दहा वर्षात इमारतीला तडे जाणे योग्य नाही. बांधकाम केल्यावर साधारणतः वीस ते 25 वर्षे इमारत सुसज्ज असणे आवश्यक आहे.
निर्मला कुचिक
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
रायगड जिल्हा परिषद