अंगणवाडी शाळा दीड महिना बंद

। नेरळ । वार्ताहर ।

ग्रामीण भागातील दोन वर्षे वयोगटातील बालकांचे बागडणे जिथे सुरु होते त्या अंगणवाडी केंद्रांना गेल्या चार डिसेंबर पासून टाळे लागले आहे. दीड महिना अंगणवाडी केंद्र बंद असून कर्जत तालुक्यातील सर्व 331 अंगणवाडी केंद्र बंद आहेत. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील अंगणवाडी केंद्र बंद असून प्रामुख्याने लहान बालकांचे घराबाहेर पडणे थांबले आणि बागडणे देखील थांबले आहे. दरम्यान, अंगणवाडी केंद्रावर महिला बचत गट यांच्याकडून पोषण आहार देण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडीसेविका आणि मतनीस यांच्या न्यायहक्कासाठी आंदोलने करत आहे. मात्र, राज्य सरकारकडून आश्‍वासनांपलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही. या संघटनेने राज्यव्यापी आंदोलन केले आहे. कर्जत तालुक्यातील एकूण 331 पैकी 281 अंगणवाड्या या पहिल्या टप्प्यात संपावर गेल्या होत्या. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून कर्जत तालुक्यातील सर्व 331 अंगणवाड्या आणि माथेरान शहरातील चार अशा 335 अंगणवाड्या या संपत सहभागी आहेत. परिणामी, अंगणवाडीतील मुले घरीच बसून असल्याने त्यांना पोषण आहार मिळणे बंद झाला आहे.


ग्रामीण भागातील पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली असून शहरी भागातील पालकांना आपल्या मुलांसाठी अनेक पर्याय आहेत. पण ग्रामीण भागातील बालके अंगणवाडी केंद्र बंद असल्याने केवळ पोषण घेण्यासाठी केंद्रावर जात आहेत. शासनाने मागण्या मान्य करून ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्र सुरू करून गरीब बालकांचे बागडणे सुरू होईल.

सुभाष नाईक, नेरळ
Exit mobile version