| मुरूड | प्रतिनिधी |
सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहोचवण्याचे काम प्रामुख्याने अंगणवाडी सेविका करतात. कोरोना कालावधीत आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी काम केले होते. त्यांच्याच जीवावर आता मुरुड नायब तहसीलदार अमित पुरी उठले असल्याचे दिसून येते. त्यामुळे अंगणावाडी सेविकांनी सामूहिकपणे बी.एल.ओ. पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले आहे.
नजीकच्या कालावाधीत स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक विभागही जोरदारपणे कामाला लागले आहे. निवडणुकीच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. निवडणुकीच्या कामासंबंधी गुरुवार (दि.10) रोजी बैठकीचे आयोजन मुरुड प्रशासनाकडून करण्यात आले होते.
अंगणवाडी सेविकांना बीएलओचे काम देण्यात आले आहे. गेल्या सात वर्षांपसून ते काम करत आहेत. मात्र, त्यांच्या मानधनाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. या बैठकीत मानधनाबाबत विषय निघाला. त्यावेळी नायब तहसीलदार अमित पुरी यांनी उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविकांना अपशब्द वापरले. थोड्या वेळासाठी सर्वच अवाक् झाले, मात्र पुरी यांचा तोल सुटला होता. तुमच्या तोंडातून दिवाळीचा घास काढीन… अंगणवाडीच्या नोकर्या सोडून द्या… राजीनामा द्या, असे अपशब्द वापरल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आम्हाला मानधन तर मिळाले नाहीच, मात्र अपशब्द वापरुन आमची मानहानी केली, असेही निवदेनात नमूद केले आहे. अमित पुरी यांनी महिलांना अपशब्द वापरले, तसेच दमदाटी केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात वैशाली जोशी, प्रतीक्षा ठाकूर, सायली कासेकर, दर्शना नाईक, जीवदानी पाटील, मनीषा ठाकूर, भूमिका पाटील, रश्मी कमाने यांच्यासह अन्य अशा एकूण 17 जणांची नावे आहेत.
दरम्यान, अमित पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, अंगणवाडी सेविकांनी नेमके निवेदनात काय म्हटले आहे हे मला माहिती नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, असे सांगितले.
अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेले निवेदन मी वाचले आहे, मात्र त्यामध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत, तसे काहीच झालेले नाही. बी.एल.ओ.चे मानधन दिलेले आहे. सोमवारी अंगणवाडी सेविकांची बैठक बोलावण्यात येईल आणि त्यांचे काय प्रश्न आहेत, ते मार्गी लावण्यात येतील.
रोहन शिंदे, तहसीलदार
अंगणवाडी सेविका घरच्या नोकर नाहीत
अंगणवाडी सेविका सातत्याने तळागाळात काम करत असतात. त्यांना देण्यात येणारे तुटपुंजे मानधनदेखील वेळेवर मिळत नाही. त्याच अंगणवाडी सेविकांना सरकारी अधिकारी अशा प्रकारे अपनास्पद वागणूक देणार असतील, तर सरकारच्या विविध योजनांचा बट्ट्याबोळ झाला म्हणून समजा. सामंजस्याने विश्वासात घेऊन चांगले बोलून काम करण्याची कला अवगत असणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविका हे संबंधित अधिकार्यांच्या घरचे नोकर नाहीत, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. अशाच वृत्तीमुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकार घडतात.
माझी पत्नी आशा सेविकेचा काम करुन बी.एल.ओ.च काम करीत होती. नायब तहसीलदार अमित पुरी यांच्या जाचाला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी राजीनामा दिला. जर काम केले नाहीत, तर तुमच्यावर केस करेन, तुम्हाला मानधन देणार नाही, असे सारखे धमकावत होते.
दिपक गिते
राजपुरी