कर्मचार्याने केली सुरक्षारक्षकाची हत्या
। नागपूर । प्रतिनिधी ।
कंपनीचे प्रवेशद्वार न उघडल्याच्या संतापातून एका कर्मचार्याने तेथील सुरक्षारक्षकाची लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या केली. या प्रकरणात कंपनीच्या मालकांनी गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करत पोलिसांची दिशाभूल केली होती. अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र चौकशीनंतर सुरक्षारक्षकाची हत्या झाल्याची बाब समोर आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
एमआयडीसीमध्ये उज्वल ईस्पात प्रायव्हेट कंपनी आहे. तेथे 8 ऑक्टोबर रोजी कमलेश रामसुजन पटेल (50) यांचा मृत्यू झाला होता. त्यांना मेडिकलमध्ये खोट्या नावाने नेण्यात आले होते. चौकशीदरम्यान ही हत्या असल्याची बाब स्पष्ट झाली. 8 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता कंपनीचे प्रवेशद्वार लवकर उघडले नाही, यावरून मनोहर उर्फ मनोज बबन बेंडे (42, बाभुळगाव, यवतमाळ) याने पटेल यांची लोखंडी रॉडने प्रहार करत हत्या केली होती. त्यानेच सुरेश चंदानी व धर्मेश चंदानी यांच्या सांगण्यावरून मेडिकलमध्ये खोट्या नावाने नेले. 10 ऑक्टोबर रोजी पटेल यांचा मृत्यू झाला होता. कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर मालकांनी काढून टाकला आणि बेंडेला पैसे देऊन कंपनीतून पळवून लावल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला व बेंडेला अटक केली आहे. कंपनीच्या मालकांना अद्यापही अटक झाली नसून पोलिसांवर कुणाचा दबाव येत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.