रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याचा गौप्यस्फोट; पत्रकार परिषदेत केला जिल्हाध्यक्षांनी निषेध!
। खोपोली । प्रतिनिधी ।
रायगड रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांच्या मागण्या महायुती मान्य करत नसेल तर महायुतीत राहण्याबाबत फेरविचार करावा लागेल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी खोपोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. याचवेळी त्यांनी बोलताना विधानसभा निवडणुकीत कर्जत व पेण हे दोन तालुके रिपब्लिकन पक्षाला महायुतीतर्फे सोडण्यात यावे, अशीही मागणी केली.
महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, व भारतीय जनता पक्ष या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी रायगडमधील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. रायगड जिल्हा नियोजन सदस्यपदी त्याचप्रमाणे विविध शासकीय महामंडळावर सदस्य म्हणून मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचा वाटा द्यायला पाहिजे होता, तो अद्याप दिला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. याबाबतही राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे कैफियत मांडली आहे, असे नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले. त्याचा महायुतीच्या वरिष्ठांनी विचार करावा अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा गंभीर इशारा नरेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी सातत्याने संपर्क करीत असतानाही, गेल्या अडीच वर्षात आम्हाला त्यांनी वेळही दिला नाही. तसेच आमच्याशी बोलणंही टाळले त्यामुळे अशा पालकमंत्र्यांचा आम्ही निषेध करतो, असे सांगून नरेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाची उघडपणे नाराजी व्यक्त केली. यामुळे महायुतीत सारे काही आलबेल आहे असे दिसून येत नाही. पक्षाच्या या इशार्याकडे महायुतीतील वरिष्ठ नेते कसे पाहतात हे पाहावे लागेल. ऐन निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या इशारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाभरातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.