दोन मंत्र्यांमध्ये रस्सीखेच; ध्वजारोहणही ‘आलटून-पालटून’
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महायुतीचे सरकार सत्तेत येऊन बराच काळ लोटला, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले; मात्र रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. परिणामी, जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची खुर्ची आजही रिकामीच आहे. एकीकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या मंत्री आदिती तटकरे, तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी या पदावर दावा कायम ठेवला आहे. या राजकीय संघर्षामुळे प्रशासनातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याचा परिणाम इतका गंभीर झाला आहे की, जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यक्रमांमध्येही ‘स्थिर’ पालकमंत्री नसल्याचे चित्र दिसत आहे. 1 मे महाराष्ट्र दिनी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले; तर इतर वेळी हा मान दुसऱ्या मंत्र्याकडे जात असल्याने जिल्ह्यात ध्वजारोहणही ‘आलटून-पालटून’ करण्याची वेळ आली आहे.
राजकीय स्तरावर हा पेच सुटत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “जिल्ह्याला एक जबाबदार नेतृत्व मिळायला हवे,” अशी भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, पालकमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल. त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे निर्णयाधिकार असल्याचे सांगितले.
“पालकमंत्री कोण असेल हा प्रश्न वेगळा असला, तरी रायगडच्या विकासात कोणताही खंड पडू देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, “जिल्ह्याला अधिकृत पालकमंत्री कधी मिळणार?” असा येथील जनतेचा सवाल कायम आहे. दरम्यान, राज्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असून, गेल्या दोन वर्षांत संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. बालविवाहात सहभागी ग्रामस्थ, ढोल-ताशा पथक तसेच इतर संबंधितांवरही कारवाई सुरू असून, त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण घटत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 18 वर्षांखालील गरोदर मातांची संख्या चिंताजनक असल्याचे नमूद करत, बालविवाह आणि कुपोषण शून्याच्या जवळ आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.







