रुग्णसेवेसाठी ‘लायन्स गौरव’ प्रदान
| महाड | प्रतिनिधी |
गेली अनेक वर्षे निःस्वार्थ भावनेने रुग्णवाहिका सेवा देणारे महाड येथील अनिल चव्हाण यांना लायन्स क्लब ऑफ महाडतर्फे ‘लायन्स गौरव’ ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा गौरव प्रदान करण्यात आला.
सन 1998 पासून अनिल चव्हाण रुग्णवाहिका चालवत असून, रायगड जिल्ह्यात रुग्णवाहिका सेवा अत्यल्प असताना त्यांनी श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, बाणकोट, मंडणगड, पोलादपूर आणि महाड असा विस्तृत परिसर कव्हर करत अनेक रुग्णांना वेळेवर सेवा दिली. अनेक वेळा पनवेल आणि मुंबईपर्यंत दोन-तीन फेऱ्या करून रुग्णांचे प्राण वाचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात, आंबेनळी, सावित्री पूल दुर्घटना तसेच कोरोना काळातही त्यांनी तत्परतेने सेवा बजावली. अपघातग्रस्तांना मदत करताना प्रामाणिकपणा जपत त्यांच्या वस्तूंना हात न लावण्याची स्वच्छ प्रतिमा त्यांनी कायम राखली आहे. पोलीस यंत्रणेलाही त्यांच्या सेवांवर पूर्ण विश्वास असून त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जाते.लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संजीव सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख प्रवीण सरनाईक, विजय गनात्रा तसेच लायन्स क्लब महाडच्या अध्यक्षा स्नेहल बुटाला यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. अनिल चव्हाण यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
