लंपीविरोधात पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार

लसीकरणाबरोबरच गोठ्यांमध्ये औषध फवारणी कार्यक्रम


| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामध्ये लंपीचा शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग कामाला लागले आहे. लसीकरणाबरोबरच माझा गोठा स्वच्छ गोठा अंतर्गत गावांमधील अनेक गोठ्यांची स्वच्छता राखण्यासाठी औषध फवारणीसारखे उपक्रम घेण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या हस्ते गोपूजन करून गायीचे लसीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेश लाळगे, डॉ. मेघा खवसकर, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.कैलास चौलकर, डॉ. प्रिया काळे, डॉ.सुहास जोशी हे उपस्थित होते.

मापगाव हद्दीतील गोठ्यांमध्ये आणि गोठ्यांच्या परिसरामध्ये गोचीड गोमाशी निर्मूलनाकरीता कीटकनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. पशुपालक, महिला बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लंपी आजाराचे लक्षणे, त्यावरील उपाय तसेच किसान क्रेडीट कार्ड याची माहिती देण्यात आली. सोगाव, मुनवली, चोरोंडे, बहिरोळे, बेलवली, मापगाव, मुशेत गावांमध्ये 340 गुरांचे लसीकरण करण्यात आले. माझा गोठा स्वच्छ गोठा अंतर्गत गोठ्यांमध्ये व गोठ्याच्या परिसरात गोचीड गोमाशी निर्मुलनाकरीता कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात आली.


अलिबाग तालुक्यात व जिल्ह्यात वेळोवेळी लसीकरण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना होत असल्याने लंपी आजार अद्यापही रायगडमध्ये आढळून आलेला नाही.शेतकऱ्यांसह पशुपालकांनी जनावरांची योग्य पध्दतीने काळजी घेऊन लंपीला रोखण्याचा प्रयत्न करावा. पशुसंवर्धन विभागातील केंद्र पुरस्कृत योजना तसेच इतर योजनांचा लाभ पशुपालकांनी घ्यावा . गाय, म्हैस पालन,शेळ्या, कोंबडी पालनाकडे तरुणांनी वळावे.

डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version