। अलिबाग । प्रतिनिधी ।
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती अलिबागमध्ये साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त भादाने येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 190 हून अधिक शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण करण्यात आले. तसेच जंतनाशक औषध वाटप व खनिज मिश्रण वाटप करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेश लाळगे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरुवातीला अभिवादन करण्यात आले. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 चौल, ता. अलिबाग, जि. रायगड या संस्थेंतर्गते भादाने येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मेंढपाळ महेंद्र चोरमले यांच्याकडील 135 मेंढ्या व 25 शेळ्यांचे लसीकरण करण्यात आले. डॉ. राजेश लाळगे यांच्या हस्ते जंतनाशक औषध व खनिज मिश्रण वाटप करण्यात आले. पशुधन पर्यवेक्षक समाधान मेटकरी, परिचर भगवान नाईक उपस्थित होते.