बोटींवर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी; आर्थिक हितसंबंध जपत अधिकारी गप्प?
| उरण | प्रतिनिधी |
पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असताना उरणच्या समुद्रात सर्रास मासेमारी सुरू आहे, आणि अधिकारी ‘डोळे असून अंध’ बनले आहेत, असा आरोप स्थानिक मच्छिमारांकडून होत आहे. अधिकार्यांसोबत आर्थिक साटेलोटे असल्यामुळे याच धंद्याच्या मार्यात नियम, कायदे आणि तक्रारींची पायमल्ली होत आहे. म्हणूनच स्थानिक पारंपरिक मच्छिमारांनी बोटींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करत या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्याचा ठोस इशारा दिला आहे.
उरणच्या करंजा व मोरा बंदरात उभ्या असलेल्या बोटींवर पर्सनेट मासेमारीचं साहित्य उघडपणे ठेवलेलं असतानाही मत्स्य विभागाचे अधिकारी तोंड बंद ठेवून आर्थिक हितसंबंध जपत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार करीत आहेत. हे अधिकारी कागदावर बंदी दाखवतात, पण समुद्रात मात्र मासेमारीचे इंजिन दिवस-रात्र धावत असते. यावर आळा घालायचा असेल तर सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे, असे मच्छिमारांचे म्हणणे आहे.
माशांचा प्रजनन काळ 1 जूनपासून सुरू होतो, आणि त्यावेळी मासेमारी पूर्णबंदी असते. पण कायद्याचं बोट धरून उरणमध्ये उलट मासेमारी आणखी जोरात सुरू असते! अधिकारी आणि धनदांडगे मच्छिमारांचे संबंध इतके घट्ट आहेत की, नियम फक्त गरीब मच्छिमारांना दाबण्यासाठी वापरले जातात, असा आरोप करण्यात येत आहे.
लेखी तक्रारी? फाडून टाकतात! बेकायदेशीर मासेमारी? पाठीशी घालतात! डिझेल घोटाळा? ढकलून ठेवतात! खलाशी बेपत्ता? गप्प बसतात! म्हणूनच पारंपरिक मच्छिमारांनी प्रत्येक मच्छिमार बोटीवर सीसीटीव्ही बसवा, मग कळेल कोण समुद्रात मासे पकडतो आणि कोण खासगी ऑफिसात आर्थिक हितसंबंध जपतो, हे उघडे होईल, अशी मागणी केली आहे. मच्छिमारांची ही रास्त मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री पूर्ण करणार की नेहमीप्रमाणे गप्प बसणार? असा सवाल विचारला जात आहे.